माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या परभणी जिल्हा दौऱ्याने काँग्रेसमध्ये नवे वारे वाहण्यास प्रारंभ झाला असून, एकदिलाने वागण्याचा चव्हाण यांनी दिलेला सल्ला जिल्हय़ातील सर्वच काँग्रेस नेत शिरोधार्ह मानण्याच्या स्थितीत असल्याचे दिसते. सर्व गट-तट विसरून ‘मिलके चलो’चा नारा चव्हाण यांनी दिल्याने काँग्रेसच्या जिल्हय़ातल्या सर्व नेत्यांना एका मालेत गुफण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचेही संकेत मिळाले.
जिल्हय़ाच्या दौऱ्यात चव्हाण यांनी रविवारी सेलू येथे वाल्मीकी अर्बन नागरी बँकेच्या शाखेचे उद्घाटन केले. परभणीत कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली. एरवी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्हय़ात राष्ट्रवादीचाच दबदबा कायम असतो. पक्षीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अनेक उपक्रम सुरू असतात. चव्हाण यांच्या दौऱ्याने मात्र काँग्रेस वर्तुळात नवीन ‘चहलपहल’ सुरू झाली. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या शिडात या दौऱ्याने हवा भरण्यास सुरुवात झाली.
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांचे गट एकेकाळी सक्रिय होते. देशमुख यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याचा प्रयत्न चव्हाण करीत असल्याचे दिसून आले. मराठवाडय़ात काँग्रेसचे धुरीणत्व आपल्यालाच करायचे असे चव्हाण यांनी मनोमन ठरवले असावे, तसा संदेशच त्यांच्या या दौऱ्यातून मिळाला. आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे या नेत्यांसह मेघना बोर्डीकर, आनंद भरोसे, अशा युवा नेत्यांचा संच काँग्रेसकडे आहे. कधी काळी दोन गटांत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या व कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचे काम अशोकराव करीत असल्याचे दिसून आले.
या सर्वामधून चव्हाण आता पक्षीय पातळीवर नवे पर्व सुरू करीत असल्याचे दिसते. आपल्या कार्यक्रमांमधून त्यांनी आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचाही संदेश दिला. विरोधकांना चीत करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे सूचित केले. आता अशोकरावांनी जो अध्याय सुरू केला तो सर्वाना सोबत घेऊन जाण्याचा आहे. त्यांच्या एक दिवसाच्या परभणी जिल्हा दौऱ्यात याचे प्रत्यंतर प्रकर्षांने आले. अशोकरावांच्या या दौऱ्याने परभणी जिल्हय़ातल्या काँग्रेसमध्येही नवी झळाळी निर्माण झाल्याचे चित्र आहे.