संकटात असलेल्या महिलेला तात्काळ मदत पोहोचण्याच्या दृष्टीने गस्त घालण्यासाठी शहर पोलिसांना २३ वाहने मिळाली असून या वाहनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी हिरवी झेंडी दाखविली. राज्याची पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने पोलीस दलाचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याची ग्वाही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री राम शिंदे व डॉ. रणजित पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, होमगार्डचे महासंचालक अहमद जावेद, गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, सहपोलीस आयुक्त अनुपकुमारसिंह आदींसह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
 पोलिसांना अद्यावत साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असून पोलीस दलाचे आधुनिकीकरण केले जाणार असल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यास एक अशी २३ अद्यावत ‘डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टिम’ वाहने मिळाली आहेत. त्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतत गस्त घालतील. संकटग्रस्त महिलेने पोलीस नियंत्रण कक्षात संपक साधून मदत मागितल्यावर ही माहिती लगेचच या वाहनास दिली जाईल व हे वाहन संबंधित महिलेच्या मदतीसाठी रवाना होईल. या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून मुख्यमंत्र्यांनी रवाना केले.