रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोर तासन् तास रांगेत उभे राहण्याची मध्य रेल्वेवरील प्रवाशांची समस्या दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने वेळोवेळी काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय ठरलेली उपाययोजना म्हणजे एटीव्हीएम यंत्रे आणि स्मार्टकार्ड! सुरुवातीला काही मोजक्याच स्थानकांवर असलेली ही एटीव्हीएम यंत्रे आता मध्य रेल्वेवरील ७४ स्थानकांवर लागली असून त्यांची संख्या ६५० पेक्षा जास्त झाली आहे. एटीव्हीएमवर स्मार्टकार्डच्या माध्यमातून तिकीट काढणे नुसते सुलभच नसून प्रवाशांना दर शंभर रुपयांमागे ५ टक्के सवलत मिळत असल्याने फायदेशीरही आहे.
मध्य रेल्वेवर सुरुवातीला एटीव्हीएमची संख्या ३८० एवढी होती. यातील काही एटीव्हीएम बिघडली असल्याने ही संख्या ३५०च्या आसपास असल्याचे बोलले जात होते. मात्र मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या नव्याने २७५ एटीव्हीएम मशिन्स दाखल झाली आहेत. त्यामुळे ही संख्या ६५८ एवढी झाली आहे. २० मार्चपर्यंत त्यापकी ९८ एटीव्हीएम नादुरुस्त होती. मात्र यापकी बहुतांश यंत्रे पुन्हा दुरुस्त करून विविध स्थानकांवर तनात करण्यात आली आहेत.
एटीव्हीएम व स्मार्टकार्ड तसेच फेसिलिटेटर यांच्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत झाली आहे. एटीव्हीएमवरून खरेदी होणाऱ्या तिकिटांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या प्रणालीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. नव्याने आलेली एटीव्हीएम यंत्रे गरजेनुसार मोठय़ा स्थानकांवर लावण्यात आली असली, तरी लहान स्थानकांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. आगामी काळात या यंत्रांमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रयत्न असेल, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये एटीव्हीएमवरून विकल्या जाणाऱ्या तिकिटांचे प्रमाण एकूण तिकीट विक्रीच्या २० टक्के एवढे होते. त्यामुळे एटीव्हीएमला लोकप्रियता असल्याचे लक्षात आले होते. परिणामी मध्य रेल्वेने काही स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रांची संख्याही वाढवली आहे.

एटीव्हीएमची
स्थानकांनुसार संख्या
सीएसटी          १७
भायखळा        ११
दादर              १९
सायन           १३
कुर्ला             २४
घाटकोपर     २२
विक्रोळी       १५
कांजूर          १३
भांडूप          १३
मुलुंड           २२
ठाणे             ३९
डोंबिवली      २४2
कल्याण       ३३
बदलापूर      १३
वडाळा          १२
वाशी             १५
नेरूळ            १२
पनवेल         १४