या वर्षी झालेल्या कमी पावसाचा मोठा फटका जिल्ह्य़ातील जवळपास एक लाख एकर क्षेत्रावरील मोसंबी पिकास बसणार आहे. जालना जिल्हा मोसंबी फळबागांमध्ये राज्यात अग्रेसर असून या पिकांची सर्वाधिक लागवड असलेल्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यात या वर्षी जिल्ह्य़ात सर्वात कमी पाऊस झालेला आहे.
जिल्ह्य़ातील एक लाख एकरापैकी निम्म्या म्हणजे ५० हजार एकरवरील मोसंबीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. एकूण ५० हजार एकर डाळिंबापैकी सुमारे १२ ते १५ हजार एकरवरील डाळिंबाचे मोठे नुकसान पाण्याअभावी होणार असल्याचे अंदाज आहे. पाण्याअभावी उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. पाणी नसल्याने अनेक भागात या वर्षी मोसंबीची फळधारणा झालेली नाही. विहिरीत पाणी नसल्याने फळबागा कशा जगवाव्यात हा प्रश्न आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने खरीप पिके हातची गेली आणि रब्बी पिकांचीही वेगळी अवस्था नाही. जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पात सध्या सरासरी दोन टक्केही पाणीसाठा नाही. जिल्ह्य़ातील सर्व गावांतील खरीप पिकांची नजर आणेवारी ५० पैशापेक्षा खाली आलेली आहे.
दरम्यान जिल्ह्य़ातील पाणीटंचाई पिकांचे नुकसान आणि अन्य बाबींसाठी ५ अब्ज ८४ कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाकडे केली आहे. टँकर लावले, पूरक योजना घेणे इत्यादींचा समावेश पाणी योजनांमध्ये आहे. खरिपाचे जिल्ह्य़ातील बाधित क्षेत्र ९५ हजार एकर पेक्षा अधिक असून ४५ हजारपेक्षा अधिक क्षेत्रावर पावसाअभावी पेरणीच झाली नव्हती.