वेळ मंगळवारी सकाळची..मुंबईकर मेट्रो रेल्वे पकडून आपपले कार्यालय गाठण्याच्या गडबडीत असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास घाटकोपर मेट्रो रेल्वे स्थानकात धुराचे लोट आले..आगीची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली..स्थानकांमधील लिफ्ट आणि सरकते जिने थांबले.कुठे आग लागली आता काय होणार या भीतीने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली..‘मुंबई मेट्रो वन’च्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली..थोडय़ाच वेळात लक्षात आले की आग नव्हती लागली..खालच्या भागात डास पळवण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी धूर फवारत होते तो हा धूर होता..डासांनी मेट्रो रेल्वे रोखली होती..‘एक मच्छर..’ या संवादाची आठवणच नंतर साऱ्यांना होत होती. पहिल्याच पावसाळय़ात छतातून पाण्याची धार लागल्याने आणि काहीवेळा बाष्पामुळे वातानुकूलन यंत्रणेतून पाणी गळती होत असल्याने चर्चेचा विषय ठरलेली वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे मंगळवारी सकाळी सकाळी बंद पडली. घाटकोपर मेट्रो रेल्वेस्थानकात आग लागली. अशी बातमी हाहा म्हणता ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर पसरली. सगळीकडे चौकशी सुरू झाली. नंतर हा सारा डासांचा प्रताप असल्याचे लक्षात आले. घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या खालच्या भागात पावसाळय़ातील डासप्रतिबंधक उपाययोजना म्हणून नेहमीप्रमाणे महानगरपालिकेचे कर्मचारी धूर फवारणी करत फिरत होते. तोच धूर वरती मेट्रो स्थानकांत शिरला. तेथे आगीची सूचना देण्यासाठीची यंत्रणा आहे. धूर येताच ती कार्यान्वित झाली आणि साराप्रकार घडला. त्यामुळे मेट्रो रेल्वेसेवा काही काळ विस्कळीत झाली. प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट उडाली.

घाटकोपर मेट्रो स्थानकावर आग लागण्याची कसलीही घटना घडलेली नाही. सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांच्या आसपास डास प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मुंबई महानगरपालिकेतर्फे मेट्रो स्थानकाच्या खालच्या भागात धूर फवारणी सुरू होती. त्यामुळे आगीची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे स्वयंचलित अत्याधुनिक आपत्कालीन संरक्षक यंत्रणा सुरू झाली आणि लिफ्ट व सरकते जिने बंद झाले. पाच मिनिटांत धुराचे कारण आग नसून डास पळवण्यासाठीचा धूर असल्याचे लक्षात आल्यावर स्वयंचलित यंत्रणा बंद करण्यात आली आणि थोडय़ाच वेळात मेट्रोची सेवा पूर्ववत झाली.  
प्रवक्ता, मुंबई मेट्रो वन प्रा. लि.