गणेशोत्सव उंबरठय़ावर येऊन ठेपल्याने सर्वसामान्यांमध्ये उत्साहाला उधाण आले असले तरी दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा बहुतांश सार्वजनिक मंडळांनी रस्त्यांवरच मंडप थाटल्याने वाहतुकीला होणारा अडथळा नाशिककरांना सहन करावा लागणार आहे. पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकांव्दारे कितीही सूचना दिल्या तरी त्याचे पालन मंडळांकडून होत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून उत्सवासाठी बळजोरीने वर्गणी उकळण्याचे प्रकार होत असून भद्रकाली परिसरात यासंदर्भात गुन्हाही दाखल झाला आहे. सर्वसामान्यांना वर्गणीच्या नावाने धमकावून अक्षरश: लूट केली जात असून भीतीपोटी अनेक जण पोलिसांपर्यंत जाण्याचे टाळतात. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना वर्गणी जमा करण्यास परवानगीच देऊ नये असा मतप्रवाह व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवाचा मूळ हेतू कधीच लोप पावला असून काही वर्षांपासून त्यास केवळ उत्सवी स्वरूप आले असल्याचा सूर विविध चर्चामधून व्यक्त होत असला तरी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय नेत्यांकडून मंडळांनी कोणत्या प्रकारचे विधायक कार्य करावे याविषयी थेट संपर्क केला जात नाही. बोटावर मोजण्याइतपत सार्वजनिक मंडळ संपूर्ण दहा दिवस विधायक उपक्रम राबवित आपल्या कार्याचा ठसा उमटवित असले तरी बहुतांश मंडळांकडून गणेशोत्सवाच्या मूळ हेतूकडेच दुर्लक्ष केले जाते. अगदी बळजोरीने वर्गणी जमा करण्यापासून अशा प्रकारच्या मंडळांच्या दादागिरीला सुरूवात होते. दुकानदारांनी अमूकच रक्कम दिली पाहिजे यासाठी अशा मंडळांच्या कथित कार्यकर्त्यांकडून धमकाविले जाते. गणेशोत्सवास वर्गणी देण्यास कधीच कोणत्याच दुकानदाराचा विरोध नसतो. परंतु त्यांच्याकडून जी रक्कम मिळत असेल ती स्वीकारण्याऐवजी काही कार्यकर्ते ठराविक रकमेवर अडून बसतात. त्याच परिसरात दुकानदारांना कायम व्यवसाय करावयाचा असल्याने आणि दुकानाचे नुकसान होण्याच्या भीतीने दुकानदार मंडळाचे कार्यकर्ते मागतील तितकी रक्कम देण्यास तयार होतात. ज्या दुकानदारांकडून ठराविक वर्गणी देण्यास विरोध केला जातो. त्यांना शिवीगाळ, मारहाण, दुकानाचे नुकसान अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. सोमवारी भद्रकाली परिसरात एका ब्युटीपार्लरच्या संचालिकेने वर्गणी स्वरूपात ठराविक रक्कम देण्यास नकार दिल्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून या संचालिकेस शिवीगाळ करण्यात आली. तिच्या दुकानांसमोरील कुंडय़ांची तोडफोड करण्यात आली. या कथित कार्यकर्त्यांच्या नेहमीच्या त्रासाला वैतागलेल्या परिसरातील दुकानदारांनी या घटनेविषयी त्वरीत पोलिसांना कळविण्याची समयसूचकता दाखविल्याने आणि भद्रकाली ठाण्याच्या पोलिसांनीही तत्परता दाखविल्याने काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कथित कार्यकर्त्यांच्या दहशतीला न जुमानता ठराविक वर्गणी देण्यास नकार दर्शविणाऱ्या त्या ब्युटीपार्लर संचालिकेचा आदर्श शहरातील सर्वच दुकानदारांनी घेण्याची गरज आहे. नाशिक पोलिसांनीही दुकानदार तसेच सर्वसामान्यांना वर्गणीसाठी कोणी दमदाटी करीत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये बहुतेक सार्वजनिक मंडळांचे पाठीराखे राजकीय नेते आहेत. गणेशोत्सवात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याऐवजी त्यांच्या मंडळांचे मंडप ऐन रस्त्यात टाकले जातात. त्यामुळे त्या त्या परिसरातील रस्ता बंद होऊन वाहतूक कोंडीस आमंत्रण मिळते. घनकर लेन, मेनरोडवर गाडगे महाराज चौक यांसह अनेक ठिकाणी ही परिस्थिती उद्भवते. गाडगे महाराज चौकातील एका मंडळाच्या मंडपामुळे तर परिसरातील व्यापाऱ्यांचे दहा दिवस पूर्णपणे व्यवहार ठप्प होतात. कारण दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी जागाच शिल्लक राहात नसल्याचा दुकानदारांचा आक्षेप आहे. शहरात ही परिस्थिती असताना पंचवटीत नवीन आडगाव नाका परिसरात तर एका मंडळाचा मंडप थेट महामार्गालगतच्या सव्र्हिसरोडवरच उभारला जातो. त्यामुळे सव्र्हिस रोडवरील वाहतूक या मंडपाजवळूनच महामार्गाकडे वळविणे भाग पडले आहे. त्यामुळे मंडळ कुठे मंडप उभारणार आहे हे पाहूनच परवानगी देण्याची गरज असताना अशा प्रकारे नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या ठिकाणी मंडप उभारणीस परवानगी देणाऱ्या यंत्रणेचा गलथानपणाही यानिमित्ताने समोर येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2014 रोजी प्रकाशित
वर्गणीसाठी दमदाटी करणाऱ्यांना आळा कधी?
गणेशोत्सव उंबरठय़ावर येऊन ठेपल्याने सर्वसामान्यांमध्ये उत्साहाला उधाण आले असले तरी दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा बहुतांश सार्वजनिक मंडळांनी रस्त्यांवरच मंडप थाटल्याने वाहतुकीला होणारा अडथळा नाशिककरांना सहन करावा लागणार आहे.
First published on: 27-08-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most of ganesh mandal establish their pandals on road