प्रेमाचा मार्ग पोटातून जातो अशी आपल्याकडे प्रसिद्ध उक्ती आहे. परंतु पोटात अन्न शिरण्यासाठी मुख (तोंड) व गल (घसा) ही त्याची प्रवेशद्वारे असल्याने त्याचे आरोग्य चांगले राहणे ही शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची बाब आहे. वरचेवर तोंड येणे, टॉन्सिल्सचा त्रास, वारंवार घसा लाल होऊन दुखणे, मुखदरुगधी, दातांचे विकार यांसारख्या साध्या परंतु त्रासदायक मुखविकारांपासून मुख व गलभागातील कॅन्सपर्यंत अतिशय क्लेशकारक व किचकट आजारांचे प्रमाण आपल्या भारतात इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यातही या अवयवांतील कॅन्सरने ग्रस्त पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा तिपटीने जास्त आहे आणि या सगळ्यांत महत्त्वाचे कारण म्हणजे तंबाखू व तत्सम व्यसनांच्या आहारी जाणे हे आहे. मुख व गलभागातील कॅन्सरमध्ये प्राधान्याने जीभ (Tongue) कपोल – गाल ((Buccal Mucosa)ओठ (छ्रस्र्२), मुख अध भाग (Floor of mouth),वरची ताळू ((Floor of mouth)), हिरडय़ा (Gingiva), जिभेचे मूळ (Base of Tongue), गिलायू व त्या आसमंतातील भाग (Tonsillar Region), घशाच्या भित्ती (Pharyngeal Wall, Pyriform Fossa), अधोहन्वास्थी (Mandible) या अवयवांतील कॅन्सरचा समावेश होतो. यापकी जिभेच्या कॅन्सरचे व त्याखालोखाल कपोल – गालांचा अंतर्भाग याच्या कॅन्सरचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.
ल्ल १९९७मध्ये पुण्यातील एका रुग्णालयात आयाचे काम करणाऱ्या ४५ वर्षांच्या सुमित्राबाई वारंवार तोंड येणे, दात दुखणे, तोंडाला दरुगध येणे, तोंड उघडण्यास कष्ट होणे अशी लक्षणे घेऊन आल्या. त्यांची बायोप्सी (Biopsy), स्कॅन अशा तपासण्या करून CA Mandibular Alveolus Modetately differentiated squamous cell carcinoma(अधोहन्वस्थीचा कॅन्सर) असे निदान झाले. सुमित्राबाईंचा कॅन्सर तोंडापुरताच मर्यादित न राहता मानेच्या लसिकाग्रंथीतही (Lymph Nodes) पसरला होता. त्यांनी रेडियोथेरपी सुरू केली व त्याबरोबरच वाघोलीच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा चालू केली. रेडिएशन ही कॅन्सरसाठी प्रभावी चिकित्सापद्धती असली तरी त्यामुळे त्या भागातील त्वचा (Skin), तनुत्वचा (Mucous Membrane) यांना सूज येणे, लाल होणे, आग होणे अशी लक्षणे दिसतात. त्यातही मुखभागात रेडिएशन दिल्यास ही लक्षणे अधिक प्रभावाने व्यक्त होतात व रुग्णाचे अन्न घेणेच बंद होते. पर्यायाने अशक्तपणा, वजन घटणे, शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर विषाणू व जीवाणूंचा संसर्ग होणे अशा अनेक समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागते. काही वेळा यामुळे रेडिओथेरपी चिकित्सेत खंडही पडतो. सुमित्राबाईंना मात्र रेडियोथेरपी चालू असताना यापकी अगदी कमी लक्षणे निर्माण झाली आणि त्यांची तीव्रताही नाममात्र होती. आयुर्वेदिक चिकित्सेच्या मदतीने त्यांनी रेडियोथेरपी अपेक्षित काळात पूर्ण केली. वजन – शक्ती – भूक – पचन या गोष्टीही या काळात चांगल्या राहिल्या व कॅन्सर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गाठीही नष्ट झाल्या. आता यापुढील आव्हान होते ते म्हणजे यापुढे कॅन्सरने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे. यानंतर पुढे पाच वर्षे सुमित्राताईंनी वाघोलीच्या कॅन्सर प्रकल्पात नियमितपणे आयुर्वेदिक औषधे घेतली, तसेच पथ्येही काटेकोरपणे पाळली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तंबाखू व पान खाणे पूर्णपणे बंद केले. पाच वर्षांनंतर त्यांना केवळ पथ्यपालनाचे मार्गदर्शन करून वर्षांतून एकदा केवळ तपासणीसाठी येण्यास सांगितले. गेली १७ वर्षे सुमित्राताईंनी आपली रुग्णालयातील नोकरी चांगल्या प्रकारे पूर्ण केली व आता निवृत्तीनंतरचे आयुष्य मुला-नातवंडांसोबत सुखा-समाधानाने व सुदृढ आरोग्याने जगत आहेत.
ल्ल मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये ज्याप्रमाणे तंबाखू व धूम्रपान, मशेरी, मावा, पानपराग, मद्यपान अशा व तत्सम पदार्थाचे सेवन हे महत्त्वाचे कारण असते. त्याचप्रमाणे पावभाजी, पाणीपुरी, हिरव्या मिरचीचा ठेचा असे अतिशय तिखट-जळजळीत पदार्थ वारंवार सेवन करणे, ब्रेड- टोस्ट- बिस्किटे असे आंबवलेले व कोरडे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करणे, खारवलेले मासे, व्हिनेगार – टोमॅटो सॉससारखे अतिशय आंबट पदार्थ अधिक प्रमाणात व नियमित सेवन करणे ही संभाव्य कारणेही अनेक रुग्णांत आढळून आली. याशिवाय दातांच्या टोकदार कडा किंवा कृत्रिम दात यामुळे तोंडात होणाऱ्या जखमा दीर्घकाळ दुर्लक्षित करणे, रासायनिक पदार्थाशी सतत संपर्क, अशी कारणेही अनेक रुग्णांत आढळली.
ल्ल तोंडात वेदनारहित पांढरा चट्टा दिसणे, जिभेला, गालाला, हिरडय़ांना किंवा ताळूला खूप दिवस भरून न येणारी जखम- गाठ निर्माण होणे, तोंडातून रक्तस्राव होणे, वारंवार तोंड येणे, बोलण्यास – तोंड उघडण्यास व अन्न गिळण्यास त्रास होणे, दात हलणे, कृत्रिम दात लावण्यास त्रास होणे, आवाज बसणे, मानेच्या ठिकाणी गाठ जाणवणे, घसा दुखणे, घसा लाल होणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे अशी लक्षणे अधिक काळपर्यंत सामान्य चिकित्सेने बरी न झाल्यास कॅन्सरतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अशा वेळी उपरोक्त वर्णन केलेली कॅन्सरची संभाव्य कारणे थांबवून नित्यनियमित सकाळी व रात्री आयुर्वेदिक दंतमंजनाने दंतधावन करणे, आहार सेवन केल्यावर हळदीच्या पाण्याच्या गुळण्या करणे, अतिशय गोड आहार व अतिशय तिखट जळजळीत आहार वज्र्य करणे अशा साध्या-सोप्या उपायांनी पुढे मुखाचा कॅन्सर होण्याची संभावना कमी करता येते.
या पुढील लेखात आपण मुखाच्या कॅन्सरच्या चिकित्सेचा विचार सविस्तर करू.
वैद्य स. प्र. सरदेशमुख
bsdtdadar@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
कॅन्सर आणि आयुर्वेद
कॅन्सरने ग्रस्त पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा तिपटीने जास्त आहे आणि या सगळ्यांत महत्त्वाचे कारण म्हणजे तंबाखू व तत्सम व्यसनांच्या आहारी जाणे हे आहे.

First published on: 27-03-2014 at 07:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mouth cancer