रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी शिवसेना आणि आठवले रिपाइं गटात तीव्र चुरस सुरू झाली असली तरी विद्यमान काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांना पुन्हा येथून उमेदवारी मिळाल्यास त्यांच्याविरुद्ध असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लोकसभा निवडणूक अद्याप वर्षभर दूर आहे. परंतु, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने विदर्भात निवडणूकपूर्व चाचपणी सुरू केली असून संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी तयार केली जात आहे. काँग्रेसची उमेदवारी मुकुल वासनिकांच्या पारडय़ात पडण्याची दाट शक्यता लक्षात घेता वासनिकही आता अधिक सतर्क झाले असून त्यांनी चाचपणी सुरू केली आहे.
रामटेकचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक केंद्रात सामाजिक न्याय मंत्री होते. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिवपद देण्यात आले. त्यांचे संघटनात्मक कौशल्य विचारात घेऊन काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांच्याकडे महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. परंतु, स्वत:च्या मतदारसंघात गेल्या चार वर्षांत त्यांनी मतदारसंघात किती कामे केली याचा लेखाजोखा मागितला जात आहे. मुकुल वासनिक यांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी नागपुरात ग्रामीण काँग्रेसचे चिंतन शिबीर घेतले. परंतु, या चिंतन शिबिराने फरक पडणार नाही, असे मतदारांना वाटते. कारण, गेल्या चार वर्षांपासून मुकुल वासनिक कुठे होते, असा सवाल रामटेकमधील लोक करीत आहेत. ग्रामीण काँग्रेसच्या राणी कोठी परिसरात घेतलेल्या चिंतन शिबिरात मुकुल वासनिकांनी कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या सरबराईत कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. त्यांना वातानुकूलित हॉलमध्ये दोनवेळा झक्कास जेवण देण्यात आले एवढेच नव्हे तर त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासनही वासनिकांनी दिले. चिंतन शिबिरात हजेरी लावणारे अनेक काँग्रेस नेते मुकुल वासनिकांच्या बरोबरीचे नव्हते. मात्र, या निमित्ताने वासनिकांनी कार्यकर्त्यांच्या मनाचा अंदाज चाचपडण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले. मुकुल वासनिकांनी रामटेकमध्ये कोणतेही विकासात्मक काम केले नाही, मतदारांच्या भेटीगाठीसुद्धा घेतल्या नाहीत. दिल्लीच्या वर्तुळात उठबस असल्याने रामटेकला येण्यासाठी त्यांना वेळही मिळाला नाही, अशी अनेक मतदारांची तक्रार आहे. मतदारच नव्हे तर सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांलादेखील त्यांनी भेट दिली नाही, असे खुद्द कार्यकर्तेच बोलू लागले आहेत. लोकांच्या समस्यांची दखल घेणे तर दूरच उलट पक्षातील साध्या पदांवरील नियुक्तया, सरकारी नोकरी, आर्थिक मदत अशा माध्यमातून मतदारांशी संपर्क ठेवणेसुद्धा वासनिकांना जमलेले नाही. मुकुल वासनिक मतदार, समर्थकांना दूर ठेवतात. गर्दीत रमण्याची त्यांना सवय नाही, याचा फटका त्यांना बसलेला आहे.
बुलढाण्यातून २००९ साली त्यांना हलविण्यात येऊन रामटेकची उमेदवारी बहाल करण्यात आली. बुलढाण्याचे खासदार असतानाही त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांची पर्वा केली नाही, अशा प्रचंड तक्रारी आल्या होत्या. याच पद्धतीने त्यांनी रामटेकच्या मतदारांना डावलल्याची भावना आता प्रबळ झाली आहे. निवडणुकीला एकच वर्ष बाकी असल्याने मुकुल वासनिक अधूनमधून रामटेकला दिसू लागले आहेत. त्यामुळे मुकुल वासनिकांऐवजी दुसरा उमेदवार मागण्यासाठी काँग्रेसच्या एका गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.