अमली पदार्थ विक्रीविरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या वेळी आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात येतो. परंतु सध्या अमली पदार्थविरोधी शाखेच्या आझाद मैदान शाखेला एक वेगळीच समस्या भेडसावत आहे. ती म्हणडे हस्तगत केलेले अमली पदार्थ ठेवायचे कुठे? पोलिसांनी बंदी असलेल्या एका औषधाच्या तीन हजारांहून अधिक बाटल्या हस्तगत केल्या आहेत पण जागा अपुरी असल्याने या बाटल्या ठेवायच्या कुठे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
रेक्सकॉफ नावाचे एक खोकल्याचे औषध (कफ सिरप) आहे. त्याचा नशेसाठी वापर केला जातो. त्यामुळे या सिरपवर काही वर्षांपूर्वी एनडीपीएस अॅक्टनुसार बंदी घालण्यात आली आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान शाखेने गेल्या काही महिन्यांत कारवाई करून रेक्सकॉफ कफ सिरपच्या ३७०० बाटल्या हस्तगत केल्या होत्या. प्रत्येकी शंभर मिलीलीटरच्या या बाटल्या एकूण २७ खोक्यांमध्ये ठेवल्या होत्या. जूनमध्ये दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये हे सिरप हस्तगत करण्यात आले होते. मात्र या सिरपच्या बाटल्या ठेवायच्या कुठे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. मुळात जागा अपुरी, त्यात इतर छाप्यांत हस्तगत केलेले साहित्यही ठेवण्यात आले आहे.
त्यात या बाटल्यांची भर पडली आहे. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या जागेत या बाटल्या ठेवण्याचा विचार केला होता. पण तो पूर्णपणे स्वतंत्र विभाग असल्याने तो विचारही बाजूला ठेवावा लागला आहे. हस्तगत केलेले अमली पदार्थ या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर नष्ट केले जातात. आता आम्ही न्यायालयाला विशेष बाब म्हणून खटल्याच्या आधीच या कफ सिरपच्या बाटल्या नष्ट करण्याची परवानगी मागणार आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांनी सांगितले.
११ जून रोजी परळ येथे छापा घालून हे बंदी असलेले कफ सिरप जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी असद सैय्यद आणि संतोष सिंग या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. जळगावमधून या कफ सिरपच्या बाटल्या चोरटय़ा मार्गाने आणण्यात आल्या होत्या. औषध विक्रेत्यांचा या व्यवहारामागे हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रेक्सकॉफ या कफ सिरप मध्ये कोडेईन फॉस्फेट हे द्रव्य असते. ज्याचे सेवन केल्याने नशा होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2014 रोजी प्रकाशित
जप्त केलेले अमली पदार्थ ठेवायचे कुठे?
अमली पदार्थ विक्रीविरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या वेळी आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात येतो.
First published on: 02-10-2014 at 03:16 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai anti narcotics branch face problem of keeping seized narcotic drugs