लघुपट, अनुबोधपट आणि माहितीपटांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (मिफ्फ) महोत्सवाला ३ फेब्रुवारीपासून आरंभ होत आहे. यंदाच्या तेराव्या मिफ्फ महोत्सवाच्या माध्यमातून लघुपटनिर्मितीच्या या चळवळीची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विस्तारण्याचा प्रयत्न असून त्या हेतूने तीन नवे विभाग यावेळी सुरू करणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक आणि फिल्म्स डिव्हिजनचे महासंचावलक व्ही. एस. कुंडु यांनी दिली.
‘मिफ्फ २०१४’ ची सुरूवात ३ फेब्रुवारीपासून एनसीपीए येथे होणार आहे. एकाचवेळी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, गुवाहाटी, चेन्नई आणि नागपूर अशा सात मोठय़ा शहरांमधून हा महोत्सव भरवण्यात येणार आहे. यावेळच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय विभागात डेलान मोहन ग्रे यांची ‘फायर इन द ब्लड’, इयान मॅकडोनल्डची ‘अ‍ॅल्गोरिदम’, शाई हेरेडिया यांची ‘आय अ‍ॅम मॅक्रो’, किम लॉंगिनोटो यांची ‘सलमा’, जोशुआ ओपनहेमर यांची ‘द अ‍ॅक्ट ऑफ किलिंग’ आणि निष्ठा जैन यांच्या ‘गुलाबी गँग’ या लघुपटांमध्ये चुरस असणार आहे. तर भारतीय लघुपट विभागात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांची ‘सेल्युलॉईड मॅन’, सत्यांशू आणि देवांशू सिंग यांची ‘तमाश’, राजा शबीर खान यांची ‘शेफर्ड्स ऑफ पॅरेडाईज’, गोविंद राजू यांची ‘गोल्डन मॅंगो’ आणि सुनंदा भट्ट यांच्या ‘हॅव यु सीन द अराना’ या लघुपटांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मिफ्फ’चा विस्तार करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत नेदरलँड्स येथील ‘लेनेप मीडिया आणि सिनेकिड्स’च्या माध्यमातून ‘लेनेप किड्स फे स्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असून लहान मुलांसाठी बनवण्यात आलेले लघुपट, अ‍ॅनिमेशनपट आणि त्यांच्याशी संबंधित विषयांवरच्या कार्यशाळांचा या किड्स फे स्टिव्हलमध्ये समावेश असणार आहे.
याशिवाय, ‘शहरनामा’ या अनोख्या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून विविध शहरांच्या समस्या मांडणाऱ्या लघुपटांचा यात समावेश असणार आहे. ‘मिफ्फ’ मध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्याही २२ वरून ३२ एवढी वाढवण्यात आली असल्याची माहिती कुंडू यांनी दिली. यात नेहमीच्या पुरस्कारांबरोबर निर्माता, संकलक, अ‍ॅनिमेटर, सिनेमॅटोग्राफर आणि साऊंड रेकॉर्डिस्टनाही यावर्षी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.