‘युनिव्हर्सिटी विथ पोटेन्शिअल एक्सलन्स’ योजनेअंतर्गत १० कोटी रुपयांच्या बक्षिसाला पात्र ठरविताना ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ला मुंबई विद्यापीठात सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता नेमकी कुठे आढळून आली, असा प्रश्न आहे. कारण जर त्यांनी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राच्या एका कोपऱ्यातील खोलीत अपुऱ्या जागेत चालणाऱ्या ‘पत्रकारिता आणि संज्ञापन विभागा’ला भेट दिली असती तर हे बक्षीस नक्कीच मागे घेतले असते. आता तर विद्यापीठाच्या नियोजनशून्य आणि उदासीन कारभारामुळे विभागाला आपल्या परीक्षा येथल्या व्हरांडय़ात घेण्याची वेळ आली आहे.

विद्यापीठाकडे जागा नसल्याने गेली काही वर्षे या विभागाला कलिना येथील आरोग्य केंद्रात घरोबा करून आपला कारभार चालवावा लागतो आहे. त्यात आता विद्यापीठाच्या एका अजब परिपत्रकामुळे विभागाला आपल्या परीक्षाही या इमारतीतील आपल्या अपुऱ्या जागेत घ्याव्या लागणार आहेत. या केंद्रात परीक्षा घेणे शक्य नसल्याने विभागाने परीक्षा विभागाला पत्र लिहून आपली अडचण लक्षात आणून दिली. पण परीक्षा दोन दिवसांवर आली तरी त्याची दखल घेतली गेलेली नाही.
या विभागात एकूण पाच पूर्णवेळ अभ्यासक्रम चालविले जातात. या सर्व अभ्यासक्रमाचे मिळून ३०० विद्यार्थी अशी या विभागाची प्रवेशक्षमता आहे. या विद्यार्थ्यांची एटीकेटीची परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होते आहे, तर मुख्य परीक्षा ६ मेपासून सुरू होत आहे. पण या परीक्षा घ्यायच्या कुठे, असा विभागासमोर प्रश्न आहे.
पत्रकारिता व संज्ञापन या विषयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी २००३ साली स्वयंअर्थसाहाय्य तत्त्वावर हा विभाग सुरू करण्यात आला. सध्याच्या घडीला येथील अभ्यासक्रमाचे शुल्क एक लाख रुपयांच्या आसपास आहे. पण इतके शुल्क घेऊनही विद्यापीठाने या विभागाला कोणत्याही ठोस भौतिक सुविधा दिलेल्या नाहीत. लाखोंचे शुल्क घेणारे विभागाचे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या कालिना संकुलातील आरोग्य केंद्राच्या इमारतीतील एका कोपऱ्यातील खोलीत चालविले जातात.
आतापर्यंत विभागाच्या परीक्षा विद्यापीठाबाहेर विविध महाविद्यालयांमध्ये नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर होत. पण अलीकडेच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परिपत्रक काढून सर्व विभागांनी आपल्या विद्यार्थ्यांची परीक्षा विभागातच घ्यावी, असे आदेश दिले. मुळात विभागाकडे उपलब्ध असलेली जागा, विद्यार्थी संख्या, परीक्षेसाठी लागणारी शिस्तबद्ध आसन व्यवस्था व गोपनीयता याचा कुठेच ताळमेळ बसत नाही.
‘ही बाब विभागाने परीक्षा नियंत्रकांच्या पत्र लिहून लक्षातही आणून दिली. मात्र परिस्थितीचे गांभीर्य जाणूनही त्याची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. आम्हाला जागा उपलब्ध करून दिली न गेल्यास परीक्षा इथेच व्हरांडय़ात घेण्याशिवाय विभागाकडे पर्याय नसेल,’ असे विभागातील सूत्रांनी सांगितले. आता विभागाने कलिना संकुलातील सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून परीक्षेकरिता जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. यावरही प्रशासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘परीक्षेसाठी जागा मिळणे कठीणच’
पत्रकारिता व संज्ञापन विभागाने त्यांची अडचण कळविली आहे. आम्ही त्यांना परीक्षा घेण्यासाठी पर्यायी जागा शोधत आहोत. पण जागा मिळणे कठीण असल्याने त्यांना हा प्रश्न त्यांच्या पातळीवर सोडवावा लागेल.
पद्मा देशमुख, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ