महापालिका शिक्षण मंडळातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची आर्थिक परवड दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी अधिकच वाढत चालली असून निवृत्ती वेतन महिन्याच्या १५ तारखेनंतरच जमा होत असल्याने सेवानिवृत्त शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सहाव्या वेतन आयोगाचा जून १३ मध्ये द्यावयाचा पाचवा हप्ता एप्रिल २०१४ मध्ये म्हणजे तब्बल दहा महिने उशिराने दिले गेले. परंतु जानेवारी २००६ आधी निवृत्त झालेल्यांनाच तो दिला गेला. नंतर निवृत्त झालेल्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. असे घडण्यामागील कारण काय हे सेवानिवृत्त शिक्षकांना कळळे अवघड झाले आहे. मे २०१४ पासून वाढीव १० टक्के महागाई भत्ता या महिन्यापासूनच लागू करण्याचा शासन आदेश आहे.
या सर्व मागण्यांचे निवेदन संघटनेतर्फे आयुक्त आणि शिक्षण मंडळ प्रशासनाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. निवृत्तांच्या आर्थिक परवडीला अधिकाऱ्यांपेक्षा कारकूनच जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. अनुदान मागणी प्रस्ताव कारकून वेळीच करत नसल्याने अडचणी येत असतात. कारकूनांकडून संगणकीय बिघाडाचे कारण पुढे करून वेळकाढूपणा केला जातो.
या सर्वाना संगणक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यासाठी खास रजाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांनी विशेष लक्ष देऊन शिक्षण मंडळाचा कारभार शिस्तशीर होईल याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. निवेदनानंतर संघटनेचे अध्यक्ष नथुजी देवरे, जयवंत सोनवणे, उत्तम देवरे, लक्ष्मण पाटील आदींची स्वाक्षरी आहे.