मालमत्ता व्यावसायिकाचा वाढदिवशीच अपहरण करून खून

घरी वाढदिवस साजरा करणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरचे वाहनातून आलेल्या पाचजणांनी अपहरण करून खून केला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने धावपळ करून पाचही आरोपींना अटक केली.

घरी वाढदिवस साजरा करणाऱ्या एका प्रॉपर्टी डीलरचे वाहनातून आलेल्या पाचजणांनी अपहरण करून खून केला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तातडीने धावपळ करून पाचही आरोपींना अटक केली. रविवारी रात्री ही घटना घडली.
वीरेंद्र उर्फ वीरू भोलेनाथ फटिंग (रा. लवकुश नगर), विजय माणिक निरटकर (रा. नवीन बिडीपेठ), सुरेश उर्फ सूरज उर्फ कांची प्रकाश गायगवळी (रा. जुनी बिडीपेठ), अश्फाक उर्फ बाबा पठाण (रा. ताजअम्मा कॉलनी) व जितेंद्र महादेव नानोटकर (नवीन बिडीपेठ) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नरेंद्र व्यंकट पिंपळीकर (रा. दाणी अपार्टमेंट रेवतीनगर, बेसा रोड) हे खून झालेल्याचे नाव आहे. रविवारी त्याचा वाढदिवस होता. रात्री वाढदिवस साजरा करीत असताना टोयाटा फॉच्युनर कारमधून (एमएच/३१/ईए/५१५१) पाचजण त्याच्या घरी आले. त्यांनी नरेंद्रला घराबाहेर बोलावून घेतले. कारमध्ये बसवून ते तेथून निघून गेले. कारमध्ये त्याला भोसकले व रात्री त्याच आरोपींनी त्याला मेडिकल रुग्णालयात नेले. तेथे अपघातात तो गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. त्याला तेथे सोडून पळून गेले. तेथील डॉक्टरांनी नरेंद्रची बारकाईने तपासणी केली असता त्याच्या बरगडीजवळ खोल जखम दिसली. तीक्ष्ण व धारदार शस्त्राची ती जखम असल्याने तेथील डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना कळविले.
नरेंद्रचे अपहरण केल्याने त्याच्या पत्नीने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. कार क्रमांकाच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, मेडिकल रुग्णालयातून तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर हुडकेश्वर पोलीस लगेचच मेडिकल रुग्णालयात पोहोचले. मात्र, तोपर्यंत उपचारादरम्यान नरेंद्रचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह नरेंद्रचा असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी ओळखले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सकाळपर्यंत पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. नरेंद्रचा भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. त्याने एक भूखंड खरेदी केला होता. तोच भूखंड पूर्वीच्या मालकाने दुसऱ्याला विकला. मुळात मूळ मालकानेही खोटी कागदपत्रे तयार केली होती. वादात अडकलेला हा भूखंड ताब्यात घेण्याचा बीडपेठ परिसरातील एका कुख्यात आरोपीने प्रयत्न सुरू केला होता. नरेंद्र मात्र त्याला दाद देत नव्हता. त्यामुळे त्या कुख्यात आरोपीने त्याला उचलून आणण्यास सांगितले होते. कुख्यात आरोपीसमोर त्याला नेले जात होते. धाक दाखविण्यासाठी गुप्ती नरेंद्रच्या बरगडीजवळ रुतवली, मात्र अपघाताने ती आत खोलवर खुपसली गेली. त्यामुळे घाबरून त्याला लगेचच मेडिकल रुग्णालयात नेल्याचे आरोपी पोलिसांना सांगत आहेत. मात्र, पोलिसांचा यावर विश्वास नाही. या घटनेनंतर तो कुख्यात आरोपीही फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Murder in nagpur