वेडसर मुलाने माता-पित्याची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना मुखेड तालुक्यातील सकनूर येथे घडली. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने सकनूर गावात शोककळा पसरली.
मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सकनूर गावात गणपती कांबळे हे पत्नी व ३ मुलांसमवेत राहतात. तीन मुलांपकी मारोती (२२) याच्या मनावर गेल्या काही दिवसांपासून परिणाम झाला होता. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास मारोती कांबळे जागा झाला. वेडाच्या भरात त्याने आईला उठवले. मला दवाखान्यात का नेले, अशी विचारणा करीत वाद सुरू केला. वडील गणपती कांबळे हेही जागे झाले. दोघांनाही शिवीगाळ करीत त्याने लोखंडी सळीने मारहाण केली. हतबल माता-पित्याने कोणताही विरोध केला नाही. मारहाणीत दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले. गणपती कांबळे (६१) व रेजाबाई कांबळे (५५) या माता-पित्याचा खून केल्यानंतर आरोपी मारोती कांबळे त्यांच्या पार्थिवाजवळच बसून होता.
आरडाओरड झाल्यानंतर काही शेजारी एकत्र झाले. त्यांनी मुक्रमाबाद पोलिसांना माहिती दिली. विशेष म्हणजे वृद्ध माता-पिता सोमवारी मारोती कांबळेला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाणार होते. परंतु पोटच्या गोळ्यानेच त्यांचा बळी घेतला. बाऱ्हाळी येथे शवविच्छेदन केल्यानंतर सोमवारी दोघांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सटवाजी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारोती कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली.