सामाजिक भान ठेवून कार्यरत असलेल्या ‘सक्रिय नागरिक मंच’ या संस्थेने कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार कसा असावा, मतदारांच्या त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा असाव्यात, तो स्त्री की पुरुष असावा, असे दहा प्रश्न असलेला एक अर्ज कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कळवा, मुंब्रा, कल्याण- डोंबिवली परिसरातील नागरिकांकडून भरून घेण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाला सर्व थरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे, असे मंचचे निमंत्रक अॅड. संजय हिंगे, प्रा. उदय कर्वे यांनी सांगितले.
कोणत्याही राजकीय उद्देशाने ही जनमत चाचणी घेण्यात येत नसून केवळ मतदारांच्या राजकीय पक्ष, अपक्ष, नवख्या उमेदवारांकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी ही व्यापक जनमत चाचणी घेण्यात येत आहे, असे प्रा. कर्वे यांनी सांगितले. नागरिकांमध्ये मतदान, आपला उमेदवार कसा असावा याविषयीची जागरूकता निर्माण व्हावी. आतापर्यंत मतदारांवर आश्वासनांचे तुकडे फेकून निवडणुका जिंकल्या जात होत्या. त्याला आळा बसावा. राजकीय, नवख्या उमेदवारांनीही मतदारांना गृहीत धरण्याचे गणित करू नये, मतदारांची मानसिकता काय, याविषयीची मते जाणून घेण्यासाठी हे सव्र्हेक्षण करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.
अनेक नागरिकांनी स्वत:हून मागणी करून हे अर्ज भरून देण्याची तयारी दर्शवली आहे. मतदारसंघातील ज्या नागरिकांना हे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत त्यांच्यासाठी sakriyanagrik.wordpress.com, फेसबुक. कॉम / व्हाईस ऑफ डोंबिवली (इंग्रजीतून) या साइटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दलच्या अधिक माहितीसाठी महेश फणसे, अॅड. वृंदा कुलकर्णी, प्रसन्ना अडावतकर, उदय कर्वे यांच्याशी संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2014 रोजी प्रकाशित
डोंबिवलीत ‘माझा खासदार- माझ्या अपेक्षा’ उपक्रम
सामाजिक भान ठेवून कार्यरत असलेल्या ‘सक्रिय नागरिक मंच’ या संस्थेने कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार कसा असावा
First published on: 22-02-2014 at 03:09 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My mp my expectations initiative in dombivli