एकीकडे मुंबईला वानखेडे स्टेडियमवर शपथविधीची जय्यत तयारी पूर्ण झाली असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरातील निवासस्थान असलेला धरमपेठ परिसर स्वागतासाठी सज्ज होत असून त्रिकोणी पार्कमध्ये शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे.
भाजपला राज्यात बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर करण्यात आले आणि शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष करून धरमपेठ परिसरात असलेल्या फडणवीस यांच्या निवासस्थान परिसराला वेगळे महत्त्व आल्यामुळे परिसरात स्वच्छतेसोबत सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एरवी त्या भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असल्यामुळे आता महापालिकेने त्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. विशेषत: रस्त्यावरील भटक्या श्वानांना पकडले जात आहे. फडणवीस यांच्या निवाससस्थानाकडे येणाऱ्या मार्गावरील रस्ते चकाचक करण्यात आले.
शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे २ नोव्हेंबरला तारखेला दुपारी नागपुरात आगमन होणार असून नागपूर विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. विमानतळ ते धरमपेठपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. निवासस्थानासमोरील प्रांगणात सातशे ते आठशे लोक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी नागपूरकरांतर्फे फडणवीस यांचे स्वागत करण्यात येणार आहे.