शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाह्य़रुग्ण भागात रुग्णांच्या तपासण्या एकाच इमारतीत करण्यासाठी मध्यवर्ती क्लिनीक प्रयोगशाळेचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र वातानुकूलित सोय व इतर सुविधांसाठी लागणाऱ्या ५५ लाखासाठी ही प्रयोगशाळा महिन्याभरापासून कुलुपात अडली आहे.
 दरदिवशी मेडिकलच्या बाह्य़रुग्ण विभागात १५००च्या वर रुग्ण येतात, पण त्यापैकी कमीत कमी २००च्या वर रुग्णांची रक्त थुंकी आदींची तपासणी केली जाते. वाढत्या रुग्णांमुळे मेडिकल प्रशासनाने एकाच ठिकाणी या सर्व तपासण्या कराव्यात या उद्देशाने मध्यवर्ती क्लिनिकला प्रयोगशाळेच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार केला ३४५.५३ चौरस मीटरमध्ये या बांधकामाला मंजुरी मिळाली. तसेच ४२.५९ लाखाचा निधीही मंजूर झाला असून १६ जानेवारी ला या इमारतीचे उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र, वातानुकूलित यंत्रआणि इतर सोयींसाठी ही प्रयोगशाळा बंद पडली. कमी जागेत ही प्रयोगशाळा चालविली जात आहे. त्यामुळे प्रयोगशाळेत काम करणाऱ्या तंत्रज्ञ यांना रुग्णाबरोबरच येथे काम करकाम करावे लागते. त्यामुळे त्यांना अनेक अडथळ्यांना समोर जावे लागत आहे.
प्रयोगशाळेचा उपयोग रुग्णांसाठी उपयोगात आणण्यासाठी वातानुकूलित व इतर सुविधांसाठी निधी नव्हता याबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
संचालकांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली आहे. त्यांनी ५५ लाखांच्या निधीला मंजुरी दिली असून हा निधी स्थानिक पातळीवर खर्च करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे ही प्रयोगशाळा लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार आहे, असे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी सांगितले.