विदर्भ एकीकृत कृती समितीच्यावतीने व्हरायटी चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करून महाराष्ट्रात विदर्भ सामील झाला. तेव्हापासून विदर्भातील अस्तित्व संपल्यात जमा आहे. आज विदर्भ कराराला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, विदर्भाच्या जनतेशी केलेल्या करारातील एकही कलम पूर्ण केले नाही व विदर्भातील जनतेची फसवणूक केल्याची भाषणे विदर्भवादी चढाओढीने करीत होते. महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ झाला पाहिजे, यासाठी यावेळी नारेबाजी करण्यात आली.
व्हरायटी चौकात दुपारी समितीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यानंतर एक वाजता नागपूर करार जाळण्यासाठी कार्यकर्ते सरसावले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कार्यकर्त्यांनी नागपूर कराराच्या प्रती व नागपूर कराराच्या होळीचे बॅनर पेटवून वेगळ्या विदर्भाची जोरजोरात मागणी केली. स्वतंत्र विदर्भ राज्याचा विजय असो अशी घोषा यावेळी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. त्यावेळी समितीचे निमंत्रक राम नेवले, माजी आमदार भोला बढेल, बाळू घरडे, दीपक निलावार, रामेश्वर मोहबे, प्रमोद माहुरकर, शंकर भोले, अनिल पांडे, अरूण केदार आदींना पोलिसांनी अटक करून नेले. त्यामुळे विदर्भवादी संतापले. त्यांनी रास्ता रोको केले. तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेरावो केला. याठिकाणी विदर्भवादी कार्यकर्त्यांपेक्षा बघ्यांचीच गर्दी मोठी होती. व्हेरायटी चौकात दिवसा चहलपहल असते. शेकडो माणसांची रहदारी होत असते. त्यामुळे मोजकेच विदर्भवादी असताना बघ्यांमुळे विदर्भवाद्यांची संख्या फुगवून सांगण्यात आली. कार्यकर्त्यांबरोबरच काही बघ्यांनाही पोलिसांनी उचलले. मुख्यालयात नेऊन त्याठिकाणी सोडून देण्यात आले.