राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या शहराध्यक्षांविरुद्ध सुरू असलेल्या असंतोषामुळे नागपूरचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या विरोधात अनिल अहिरकर आणि कंपनीने बाह्य़ा वर सरसावल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात धुमसणाऱ्या ठिणगीचा स्फोट झाला. अजय पाटील यांना हटविण्यासाठी एका गटाने थेट अजित पवारांच्या दरबारात साकडे घातले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचा समावेश राज्य मंत्रिमंडळात झाल्यामुळे त्यांच्या जागी नवा चेहरा येईल, असे स्पष्ट झाल्याने नागपूरलाही नवा चेहरा मिळण्याच्या पाटील विरोधकांच्या आशा आणखी पल्लवित झाल्या आहेत.
नवा चेहरा अनपेक्षित आणि तरुण राहील, असे संकेत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत. हा चेहरा अजय पाटील यांना बदलविण्यात साह्य़भूत ठरू शकेल, असा विरोधी गटाचा अंदाज आहे. अजय पाटील यांनी या गटाविरुद्ध दंड थोपटले असून माझ्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांनी पक्षासाठी काय केले, असा सवाल करीत थेट मुद्दय़ाला हात घातला आहे. नागपूर जिल्ह्य़ात अनिल देशमुख हेच राष्ट्रवादीचे शक्तिशाली मंत्री आहेत. त्यांचे घर नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागात असले तरी मतदारसंघ मात्र ६० किलोमीटर दूरवरील काटोल आहे. तरीही त्यांची नागपूर शहरावर वर्चस्व ठेवण्याची प्रबळ इच्छा लपलेली नाही. त्यांचे पुत्र सलील देशमुखही विविध संघटनांच्या माध्यमातून अधूनमधून आपले अस्तित्व दाखवून देत आहेत. अनिल देशमुख समर्थकांचे नागपूरला नवा चेहरा आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात अजय पाटील यांना किमान दोन वेळा पक्षांतर्गत उठावाचा सामना करण्याची वेळ आली. यातूनही त्यांनी स्वत:चे पद टिकवून ठेवले आहे.  राष्ट्रवादीतील असंतोषाच्या ठिणग्या अजूनही विझल्या नसतानाच काँग्रेसचे शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्या विरोधातही एका मंत्र्याचा गट सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुप्तांविरुद्ध जाहीर आवाज उठविण्याची काँग्रेसच्या एकाही नेत्याची बिशाद झालेली नाही. परंतु, एक गट सातत्याने त्यांना बदलण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सक्रिय झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर शहर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
शिवसेनेतील अंतर्गत कलहाने राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता दिसू लागली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व नागपूर महापालिकेतील गटनेते शेखर सावरबांधे यांच्याविरुद्ध खदखदणारा असंतोषाचा फुगा अलीकडेच एकाएकी फुटला. हा वाद शिवसेनेचे जुने नगरसेवक बंडू तळवेकर यांनी उकरून काढला असून उद्धव ठाकरेंकडे तक्रार करण्याचे जाहीपणे सूतोवाच केले आहे. त्यामुळे सावरबांधे गटाचे समर्थक हादरले असून सावरबांधेच्या बचावासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. खरा वाद स्थायी समितीवर वर्णी लावण्यावरून उद्भवला असून बंडू तळवेकर विरुद्ध शीतल घरत असे चित्र आहे. स्थायी समितीवरून हटविल्याचे दु:ख पचवणे तळवेकरांना अवघड झाले असून त्यांनी पहिली तोफ सावरबांधेवर डागली आहे. दोघेही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करून शिवसेनेतील शिस्त चव्हाटय़ावर आणत आहेत. तरुणीच्या पोटावर आणि पाठीवर खोल जखमा असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जरिपटका पोलिसांनी आरोपी संजय विश्वकर्मा याला हुटको कॉलनी परिसरातून अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.