उन्हाळा तीव्र होऊ लागला असतानाच कोकीळ, कबुतर आणि चिमणी या पक्ष्यांमध्ये ‘एव्हियन पॉक्स’ या रोगाची लागण झाल्याचा निष्कर्ष सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन, एज्युकेशन अँड रिसर्च (वाईल्डसीईआर) या पक्षी-प्राणी संशोधक व बचाव संस्थेच्या संशोधकांनी काढला आहे. ‘एव्हियन पॉक्स’ची लागण झालेल्या तीन कबुतरांवर उपचार करून त्यांना जीवनदान देण्यात यश लाभल्याचा दावा संस्थेचे अध्यक्ष डॉ. बहार बावीस्कर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
वाईल्ड सीईआरचे संशोधक गेल्या दहा वर्षांपासून पक्षी आणि वन्यप्राण्यांमध्ये आढळणाऱ्या रोगांवर संशोधन करीत असून आतापर्यंत संस्थेचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. काही वर्षांपूर्वी भारतातील नीलगायींमध्ये ‘बॅबेसिऑसिस’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे मोलाचे संशोधन बहार बावीस्कर यांनी केले होते. गोचिडांपासून झपाटय़ाने पसरणाऱ्या या सांसर्गिक रोगाची लागण झाल्याने अनेक नीलगायी दुर्बल होऊन मृत्युमुखी पडल्या होत्या. ‘बॅबेसिऑसिस’मुळे रक्तपेशी कमकुवत झाल्याने वन्यजीव अशक्त होतो आणि मरण पावतो, असा निकष यातून काढण्यात आला होता. या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली होती. ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॉक्झा’ या नियतकालिकात सदर संशोधन प्रकाशित झाले आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात तीन अशक्त कबुतरे वाईल्ड सीईआरकडे उपचारासाठी आली. या कबुतरांच्या डोळ्यावर फोड आणि जखमांसारखे दिसणारे विशिष्ट प्रकारचे व्रण होते. सद्यस्थितीत पक्ष्यांमध्ये पॉक्स या सांसर्गिक रोगाची लागण झाल्याचे ही लक्षणे आहेत. याचे कोरडी जखम आणि ओली जखम असे दोन प्रकार असून कोरडय़ा जखमा कालांतराने बऱ्या होऊ शकतात. मात्र, ओल्या जखमांनी पक्ष्याला श्वसन करताना प्रचंड त्रास होतो आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ. बावीस्कर यांनी दिली.
‘एव्हियन पॉक्स’ हा विषाणूजन्य रोग असून पक्ष्यांच्या शरीरातील पिसे नसलेल्या भागात जखमा दिसू लागतात. तिन्ही कबुतरांच्या डोळ्यांच्या वरच्या भागात अशा जखमा आढळल्या होत्या. प्रामुख्याने डोळ्यांचा वरचा भाग, चोचच्या वरचा भाग, डोके किंवा पायावर झालेल्या जखमांनी पक्षी दुर्बल होते. काहींच्या जखमा बऱ्या होतात तर काही पक्षी मृत्यू पावतात. ‘एव्हियन पॉक्स’ ची लक्षणे पक्ष्यांमध्ये सर्वत्र आढळून येणाऱ्या ‘पॉक्स’ या रोगाशी मिळतीजुळती आहेत. डासांच्या चावण्यामुळे हा रोग पसरतो फक्त पक्षीच नव्हे तर वन्यप्राण्यांनाही या रोगाची लागण होऊ शकते, असेही बावीस्कर यांनी सांगितले.
नागपुरातील कोकिळेच्या चोचीच्या वरच्या भागावरही अशा प्रकारच्या जखमा आढळल्या आहेत, अशी वाईल्ड सीईआरचे तरुण संशोधक ओंकार गाजर्लवार यांनी दिली आहे. ‘एव्हियन पॉक्स’ ची लागण झालेल्या तिन्ही कबुतरांवर संस्थेच्या पशु चिकित्सालयात उपचार सुरू असताना दोन कबुतरे मरण पावली तर एकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. वाईल्ड सीईआरने पक्षी-प्राणी बचावाचे कार्यदेखील जोमाने चालविले आहे. संक्रातीच्या काळात नायलॉन मांज्यामुळे शेकडो पक्ष्यांचा बळी जातो. याविरुद्ध संस्थेने आवाज उठविला असून मोठय़ा संख्येने जखमी पक्षी वाचविले आहेत. उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.