निवडणुकीची धामधुम सुरू झाल्यानंतर काय किस्से घडतील याचा नेम नाही. वाशिम जिल्ह्यातही मतदारांना आवाक् करणारा किस्सा चर्चेत आहे. कांरजा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांने सगळ्याचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचं कारण म्हणजे या उमेदवाराच्या एका हातात घड्याळ आहे तर दुसऱ्या हातात शिवबंधन. त्यामुळे हा उमेदवार राष्ट्रवादीचा की, शिवसेनेचा असा प्रश्न मतदारांमध्ये पडला आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रकाश डहाके यांचं तिकीट कापत पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या निकटवर्तीय सुभाष ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यावर नाराजी दर्शवत डहाके यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बाधले होते. दरम्यान, आता २०१९च्या विधानसभा निवडणुकीत कांरजा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे प्रकाश डहाके हे कोंडीत सापडले होते.
प्रकाश डहाके यांनी निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सभाही घेतली. यावेळी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रकाश डहाके यांना पवारांसमोरच शिवबंधन सोडून घड्याळ घालण्याचा आग्रह केला. मात्र, त्याला डहाके यांनी नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत जोडल्या गेल्याने हातात शिवबंधन कायम आहे. तर मनामध्ये असलेल्या राष्ट्रवादी पक्षाची घड्याळ दुसऱ्या हातात कायम राहणार,”अशी भूमिका डहाके यांनी घेतलेली आहे. असे असले तरी मतदारांमध्ये मात्र, डहाके नेमके शिवसेनेचे की, राष्ट्रवादीचे अशी चर्चा रंगली आहे. प्रकाश डहाके यांचं राजकीय वर्तुळात चांगलं वजन आहे. ते माजी आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांचे मेव्हणे आहेत.