जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच हिंगोलीत १९व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धाचे १० ते १४ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर क्रीडा स्पर्धा होतील. पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी ही माहिती दिली. उपअधीक्षक माणिक पेरके, राम हाके, संग्राम सांगळे, महेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. दाभाडे यांच्या हस्ते क्रीडापुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. स्पर्धेतील सांघिक खेळामध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, धावणे, गोळाफेक, कुस्ती, बॉक्सींग, जलतरण, ज्यूदो, वेटलिफ्टिंग आदी प्रकारांचा समावेश आहे. नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या ४ जिल्ह्य़ांच्या संघामधून सुमारे ५०० खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्या हस्ते उद्घाटन, तर १४ डिसेंबरला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई यांच्या हस्ते होणार आहे. विजयी होणाऱ्यांची ठाणे येथे होणाऱ्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. राज्य स्पर्धेत विजयी होणाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात येणार आहे. क्रीडास्पर्धा समाप्तीनंतर १४ डिसेंबरला सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे