युवकांसाठी कार्य, शिक्षण क्षेत्रातील प्रयोग, ग्रामविकास क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये गेली पन्नास वर्षे आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ‘ज्ञान प्रबोधिनी’ संस्थेच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘ज्ञान प्रबोधिनी’ संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. शिक्षणाबरोबरच इतर अनेक क्षेत्रांमध्ये ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा विस्तार झाला आहे. महिला सबलीकरण, युवकांसाठी नेतृत्व शिबिरे, क्रीडादल, विज्ञानदल यांसारखे विविध उपक्रम, मानसशास्त्र, आयुर्विज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, नगरवस्ती अभ्यासगट, ग्रामविकासासाठी कार्य, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालय, पौरोहित्य वर्गाचे आयोजन, सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये सध्या ज्ञान प्रबोधिनी संस्था कार्यरत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ज्ञान प्रबोधिनीच्यावतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय शिक्षणप्रणाली व मनुष्यघडणीचे शिक्षण; त्याची व्यावहारिक उपयोगिता’ या विषयावरील शिक्षण परिषदेचे ७ ते ९ डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २७ जानेवारी २०१३ ला ज्ञान प्रबोधिनीच्या कामाच्या आणि उपक्रमांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सौरऊर्जेच्या प्रसारासाठी या वर्षांमध्ये काम करण्यात येणार असल्याचे ज्ञान प्रबोधिनीचे शैक्षणिक विभागप्रमुख विवेक पोंक्षे यांनी सांगितले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारामध्ये २२ नोव्हेंबपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.