पुण्यातील चोरीच्या एका प्रकरणात गुंतलेल्या येथील दोन चोरटय़ांना सुमारे सात लाख रूपयांच्या मुद्देमालासह भद्रकाली पोलिसांनी जेरबंद करण्यास यश मिळविले. संबंधितांकडून २२८ नग एलपीजी गॅस शेगडय़ा, ७२ कॅरम बोर्ड आणि २५ किलो कोंबडीच्या खाद्याचा समावेश आहे.
या बाबतची माहिती पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. द्वारका चौकालगतच्या ट्रॅक्टर हाऊसच्या परिसरात दातार अपार्टमेंटच्या गच्चीवर काही संशयास्पद साहित्य लपवून ठेवल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी वाहीद उर्फ भैय्या अब्दूल वाहिद चौधरी (२० रा. नानावली) आणि अमीर उर्फ सत्या यामीन अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. इमारतीच्या गच्चीवर एलपीजी गॅसच्या शेगडय़ांचा मोठा साठा चोरटय़ांनी ठेवला होता. या शिवाय त्यात कॅरमबोर्ड व कोंबडीच्या खाद्याचाही समावेश होता. या मुद्देमालाची संबंधितांनी कोठून चोरी केली, याची छाननी केली असता या साहित्याच्या चोरीचा गुन्हा पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथकही नाशकात दाखल झाले आहे. संशयितांना न्यायालयात हजर करून त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात या व्यतिरिक्त अन्य काही संशयितांचा सहभाग आहे काय, याची छाननी तपास यंत्रणा करत आहे.