सलग तीन महिन्यांपासून टळटळीत उन्हाच्या तडाख्यात सापडलेल्या नाशिकमधील तापमानाचा पारा काही दिवसांत चार अंशाने कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उन-सावलीच्या खेळामुळे उन्हाची तीव्रता कमी झाल्याचा सुखद अनुभव लाभत आहे. अचानक बदललेल्या वातावरणाने तापमानाचा पारा काहिसा खाली उतरला. हंगामात ४०.६ अंशांची सर्वोच्च नोंद करणारे नाशिकचे तापमान सध्या ३६ अंशापर्यंत खाली आले आहे. आता सर्वाना प्रतिक्षा आहे ती, पावसाच्या आगमनाची.
सातत्याने वर चढणाऱ्या तापमानाने एप्रिल व मे महिन्यात सर्वोच्च पातळी गाठल्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला होता. या काळात जळगाव जिल्ह्यात पारा ४३ अंशापर्यंत तर थंड हवेकरीता प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये तापमान ४० अंशाच्यावर तापमान पोहोचले होते. मालेगाव, धुळे व नंदुरबार भागातील तापमान कमी-अधिक प्रमाणात हीच पातळी होती. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची स्थिती असल्याने बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणे पसंत केले. परिणामी, दररोज दिवसभरातील पाच ते सहा तास सर्व प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाली होती. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार पूर्णपणे थंडावले. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी वाळाची तावदाने, टोप्या, पंखे, तत्सम वस्तुंच्या खरेदीकडे सर्वाचे लक्ष होते. तसेच आईस्क्रिम, थंड पेय, कलिंगड यांची मागणी वधारली. २० एप्रिल रोजी हंगामातील सर्वाधिक म्हणजे ४०.६ अंशाची नोंद झाली.
सलग काही दिवस तापमान ४० अंशाच्या आसपास स्थिरावले होते. यामुळे टळटळीत उन्हाळ्याची दाहकता जाणवत असताना मागील दोन ते तीन दिवस नागरिकांना सुखद धक्का देणारे ठरले.
नाशिकसह धुळे व जळगाव जिल्ह्यात सकाळपासून नेहमीप्रमाणे असणारे वातावरण दुपारी अचानक ढगाळ बनते. उन्हाचा तडाखा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. या घडामोडींमुळे तापमानाचा पारा गुरुवारी ३६.२ अंशावर आल्याचे माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली.
चार ते पाच दिवसांपूर्वी काही ठिकाणी बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाचे आगमन झाल्यावर या संकटातून मुक्ती मिळू शकते. यामुळे आता सर्वाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
उन्हाळ्यात शहरी भागात फारसे वीज भारनियमन झाले नसल्याने शहरवासीयांना उन्हाळा सुसह्य करण्याचा मार्ग उपलब्ध होता. पण ग्रामीण भागात मात्र नेमके उलट चित्र राहिले. सलग सहा ते आठ तासांच्या भारनियमनामुळे तप्त झळांचा सामना करणे या भागात अपरिहार्य ठरले. विहिरीत पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याची तक्रार करण्यात आली.
रणरणत्या उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढण्यात झाला. त्यामुळे बहुतांश धरणातील पातळी दोन ते तीन दशलक्ष घनफूटने कमी झाली. बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच जलसाठा कमी आहे, ती धरणे पूर्णत: कोरडी पडण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे सर्वाना पावसाची प्रतिक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik temprature 36 degree
First published on: 05-06-2015 at 12:33 IST