जायकवाडीतील पाणीसाठा कमी झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असले, तरी याच कारणाने या परिसरातील पक्ष्यांची दुनिया मात्र बहरली आहे. पाणवनस्पती उघडय़ा पडल्या, खाद्यही मोठय़ा प्रमाणात मिळू लागल्याने गुलाबी पायांच्या रोहित (प्लेमिंगो) पक्ष्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने पक्षीनिरिक्षकांना सध्या जायकवाडीचा परिसर पर्वणी ठरला आहे.
जायकवाडी परिसरात २३४ विविध प्रकारचे पक्षी येतात. यातील ७५ प्रकारचे पक्षी परदेशी आहेत. ते या परिसरात सहा महिने वास्तव्य करतात. पाय आपटून चोचीने किडे व पाण्यातील जीवजंतू खाणारा फ्लेमिंगो, पिनटेल, शॉवेलर, व्हीजन, कॉमन टिल, ब्ल्यू विंगटिग, सॅडपायपर, स्टील करल्यू, रफ अ‍ॅन्ड रिव्ह असे अनेक प्रजातीचे पक्षी जायकवाडी जलाशयावर आले आहेत.
थंडीच्या दिवसात त्यांचा मुक्काम नाथसागरात राहील. त्यानंतर ते आपल्या मूळ ठिकाणी परततील. या वर्षी शेवाळ व पाण्यातील इतर वनस्पती पाणी कमी झाल्याने पक्ष्यांना सहज खाद्य मिळत असल्याने त्यांची संख्या वाढते आहे. पाणी लवकर संपले तर मात्र एप्रिलमध्ये परतणारे हे पाहुणे या वर्षी आपला मुक्काम लवकर हलवतील. गेल्या वर्षी पाठ फरविणाऱ्या फ्लेमिंगोला पाहण्याची संधी म्हणजे विलक्षण अनुभव असल्याचे पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी सांगितले.