प्राचीन काळात भारताचे ज्ञानपीठ वैश्विक दर्जाचे राहिले आहे. आजही विद्याशाखा कोणतीही असो, देशातील शिक्षणप्रणाली इतकी समृध्द आणि दर्जेदार व्हावी की संपूर्ण जगात त्याची छाप उमटावी, असे उद्गार दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती खासदार दत्ता मेघे यांनी सावंगी (मेघे) येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित राष्ट्रीय शिक्षण दिन समारोहात काढले.     
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी आयोजित या राष्ट्रीय शिक्षक दिन समारोहाला प्रमुख अतिथी म्हणून सांसदीय कार्यमंत्री व पालकमंत्री राजेंद्र मुळक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विभूतीनारायण राय, आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, माजी आमदार सागर मेघे, गिरीश गांधी, नगराध्यक्ष आकाश शेंडे, डॉ. एस.एस.पटेल, कुलसचिव डॉ. राजीव बोरले, वैद्यक शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, नर्सिंग शाखेच्या अधिष्ठाता सिस्टर जोत्सी, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी.गोयल, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रवीण हिवरे उपस्थित होते. या समारोहात डॉ. राजेश झा, डॉ. ललीत वाघमारे, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. शौर्य आचार्य, डॉ. अमोल गडबैले, डॉ. वैशाली कुचेवार, एस.पी.मेनका यांना उत्कृष्ट शिक्षक सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर हदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांच्या ह्रदयरोगावरील उपचार या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे यावेळी अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.     
प्रारंभी या कार्यक्रमात मुळक यांनी मध्यभारतातील शैक्षणिक क्षेत्रात खासदार दत्ता मेघे यांच्या संस्थांनी दर्जेदार शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार काढले, तर डॉ. विभूतीनारायण राय यांनी खासदार मेघे यांनी शिक्षणक्षेत्रात उभे केलेले काम पं. मदनमोहन मालवीय यांच्या कार्याइतकेच तोलामोलाचे आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी खासदार मेघे यांच्या जन्मदिनानिमित्य अभिमत विद्यापीठाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षकांसोबतच विदर्भातील  सामाजिक- शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर  मोठय़ा  संख्येने  उपस्थित  होते.