म्हाडाच्या बैठय़ा चाळींमधील कमी अरुंद भितींमधून ‘नॅचरल गॅस’ची पाइपलाइन कशी आणायची हा प्रश्न ‘महानगर गॅस’ने अखेर सोडविला असून त्याचा फायदा गोराईतील बैठय़ा चाळींमधील २०० कुटुंबांना होणार आहे. सिलिंडरच्या महाग गॅसऐवजी त्यांना आता स्वस्तातला गॅस मिळणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत आतापर्यंत कुठेच बैठय़ा चाळींमध्ये नॅचरल गॅसची जोडणी करण्यात आली नव्हती. मात्र, गोराईमधील पाईपगॅसची योजना या दृष्टीने पथदर्शी प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे. कारण, त्यामुळे मुंबईत म्हाडा किंवा इतर बैठय़ा चाळसदृश घरांमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांना पाइपने गॅसचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. एकटय़ा गोराई-चारकोपमध्ये अशी सुमारे तीन हजार कुटुंबे आहेत.
इमारतींना पाइप गॅसची जोडणी मिळविण्यात अडचण येत नाही. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव झोपडपट्टय़ांमध्ये पाइपगॅसची जोडणी दिली जात नाही. दुर्दैवाने म्हाडाच्या चाळसदृश बैठय़ा वस्त्यांनाही सुरक्षेची हीच पट्टी लावत महानगर गॅस जोडणी नाकारत आले होते. म्हाडाच्या बैठय़ा चाळी झोपडपट्टय़ांच्या तुलनेत अधिक नियोजनबद्ध असूनही मुंबईत कुठेही या घरांना गॅसची जोडणी देण्यात आली नव्हती. त्यामुळे, निदान आमच्या घरांची पाहणी तरी करा आणि मग निष्कर्ष काढा, अशी मागणी येथील रहिवाशी सातत्याने केली जात होती. रहिवाशांची गरज ओळखून स्थानिक खासदार संजय निरूपम यांनी थेट दिल्लीत आपले वजन वापरून महानगर गॅसला या चाळींमध्ये सर्वेक्षण करायला लावले. ‘सर्वेक्षणानंतर या चाळींमध्ये गॅसची पाइपलाइन टाकण्यात कोणतीच अडचण नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अडचण फक्त येथील कमी रुंदीच्या भिंतींमधून पाइप कसे आणायचे, ही होती. हा प्रश्नही तांब्याचे पाइप टाकून कंपनीने सोडविला आहे,’ असे येथील नगरसेवक शिवा शेट्टी यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्या हस्ते गोराईतील पाइपगॅस जोडणी प्रकल्पाचे उद्घााटन करण्याचा विचार आहे. याचा राजकीय फायदा निरूपम यांना किती होईल हे आगामी लोकसभा निवडणुकीत समजेल. गोराईकर मात्र आपल्या स्वयंपाकघरात आलेल्या स्वस्त व सुरक्षित गॅसजोडणीमुळे नक्कीच सुखावले आहेत.
यांचा मान पहिला
गोराईतील क्रमांक १ मधील ‘अरुणोदय सोसायटी’त राहणारे शंकर माने यांच्या घरात ‘महानगर गॅस लिमिटेड’चे पहिले मीटर बसविण्यात आले.
नॅचरल पाइपगॅसमुळे आमचा गॅसवरचा खर्च निश्चितपणे कमी होईल. पाच-सहा जणांच्या कुटुंबाला महिन्याला लागणाऱ्या सिलिंडर गॅसचा खर्च ४५० ते ५०० रुपये होतो. आता दोन महिन्यांकरिता या कुटुंबाला साधारणपणे सहाशे रुपये खर्च येईल. हा अंदाज खरा ठरला तर आमचा गॅसवरचा खर्च चांगलाच कमी होईल. शिवाय सिलिंडरपेक्षा हा गॅस सुरक्षितही आहे.
शोभा दास, रहिवाशी, अरूणोदय सोसायटी
गोराईच्या म्हाडा चाळींमध्ये पाइपने गॅसजोडणी देण्यात काहीच अडचण नसल्याचा निष्कर्ष आमच्या तज्ज्ञांनी काढला आहे. येथील घरांच्या रचनेनुसार सुरक्षेच्या अन्य पयार्याचा विचार आम्ही केला आहे. त्यामुळे, येथील रहिवाशी जसजसे मागणी करतील तशी त्यांना जोडणी दिली जाईल.
मीरा अस्थाना, प्रवक्ता, महानगर गॅस