ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी नवलभाऊ फिरोदिया हे माझ्या जीवनात दीपस्तंभासारखे आधार ठरल्याचे सांगतानाच देश व समाजासाठी व्रत घेऊन आयुष्यात आपण जे काही करू शकलो. नवलभाऊंच्या विचारांमधूनच बरेच काही शिकायला मिळाल्याचे कृतज्ञ उदगार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्घी येथे बोलताना काढले.
राळेगणसिद्घी येथे हिंद स्वराज ट्रस्टच्या इमारतीमध्ये साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे उदघाटन नवलभाऊ फिरोदिया यांचे पणतू अमेय व अनंत फिरोदिया तसेच वीर चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नवलभाऊ यांचे चिरंजीव फिरोदिया ट्रस्टचे अध्यक्ष, उद्योजक अभय फिरोदिया, प्रसन्न फिरोदिया, प्रदीप मुनोत, श्रीबाला चोरडिया, नरेंद्र फिरोदिया, अण्णांचे ज्येष्ठ सहकारी ठकाराम राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
नवलभाऊंच्या जीवनातून जे काही शिकायला मिळाले ते माझ्यासाठी आजही मार्गदर्शक असल्याचे सांगून अण्णा म्हणाले, नवलभाऊंच्या विचारांची ऊर्जा नेहमीच मिळत असल्याने मी मरणाला कधीही घाबरलो नाही. भाउंच्या विचारांचा काही अंश मी माझ्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला. शरीरात प्राण असेपर्यंत असे प्रयत्न मी करीतच राहणार. नवलभाऊंच्या विचारांची परंपरा अभय फिरोदिया तसेच त्यांची मुले प्रसन्ना व श्रीबाला हे पुढे चालवित आहेत. ते समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मी अनेकदा पाहीले आहे की नवलभाउ प्रत्येक गोष्टींचा शोध घेत असत. कोणी मदत मागण्यासाठी आल्यावर ते त्यांनी मदत करीत नसत तर गरज कोठे आहे याचा ते शोध घेत असत. अनेक ठिकाणी ते स्वत: तेथे जाऊन मदतीचा हात देत असत. त्यांचा हा उदारपणा आपणास भावल्याचेही अण्णांनी या वेळी बोलताना सांगितले.
उद्योजक अभय फिरोदिया यांनी काँग्रेस तसेच आम आदमी पार्टीची विचारसरणी डावी असल्याची टीका केली. अनेक देशांमध्ये डावे विचार उखडून फेकून देण्यात आल्याचे सांगून मुल्ये बदलून देशाचे भले होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चा, चर्चा, खुर्चा तसेच पूजाअर्चेने देश पुढे कसा जाणार याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. हा विचार करताना देशाचे आर्थिक भवितव्य कोण सुधारू शकेल याचा विचार करणे गरजेचे आहे. लोकसंख्या झपाटयाने वाढत असल्याने नोक-यांची निर्मीती करणे गरजेचे आहे. हे कॉंग्रेस, आम आदमी पार्टी करू शकेल का? यासंदर्भात मी राजकीय पक्षाचा विचार करीत नाही तर नेत्याचा विचार करतो आहे. आज महात्मा गांधी असते तर ते सोनिया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये नक्कीच नसते असे ठामपणे नमूद करून देशाची आर्थिक स्थिती सुधारून सुबत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेल्यास त्यातून त्याचे उत्तर मिळेल. मी कोणत्याही नेत्याचा पाठीराखा नाही. परंतु मला मनापासून वाटते की नरेंद्र मोदी यांच्यासारखा माणूस हे करू शकतो. तुम्ही त्यांना मत द्यायचे की नाही हे तुम्हीच ठरवायचे आहे. मी माझे मत देताना या माणसामध्ये देशाला सशक्त सुदृढ करण्याची, सुबत्ता आणण्याची पात्रता आहे की नाही तसेच हा माणूस वैयक्तिकरीत्या स्वच्छ आहे की नाही हे तपासले पाहिजे असे फिरोदिया म्हणाले.
हजारे यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे ते पूर्ण करायचे असेल तर आर्थिक सुबत्ता आणणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराचे मूळ आर्थिक अराजकताच आहे. आज आपल्या देशात जो भ्रष्टाचार आहे ती व्यवस्था कॉंग्रेस राखू इच्छिते तर आम आदमी पार्टी ही व्यवस्था अधिक गुंतागुंतीची करू पाहात आहे. या अर्थव्यवस्थेस सुदृढ करणे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे, असेही फिरोदिया यांनी सांगितले.
ठकाराम राऊत, प्रदीप मुनोत यांचीही या वेळी भाषणे झाली. सुभाष पठारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर दगडू मापारी यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
नवलभाऊ फिरोदियांचे विचार दीपस्तंभासारखे- हजारे
ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी नवलभाऊ फिरोदिया हे माझ्या जीवनात दीपस्तंभासारखे आधार ठरल्याचे सांगतानाच देश व समाजासाठी व्रत घेऊन आयुष्यात आपण जे काही करू शकलो. नवलभाऊंच्या विचारांमधूनच बरेच काही शिकायला मिळाल्याचे कृतज्ञ उदगार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्घी येथे बोलताना काढले.
First published on: 03-02-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naval bhau firodiya consider like beacon hazare