आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र लढणार की स्वतंत्र याचा निर्णय राज्यात नव्हे तर दिल्लीत सोनिया गांधी व शरद पवार एकत्र बसून घेतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितले. मात्र राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, येत्या शुक्रवारी (दि. २६) पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात प्रत्येक मतदारसंघातील संभाव्य उमेदवार व लढतींबाबत विचारविनिमय करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पिचड यांनी आज शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे शिर्डीचे शहराध्यक्ष अभयराजे शेळके, सुधाकर शिंदे, पितगराव शेळके आदी उपस्थित होते. राज्यातील सिंचन घोटाळय़ाबाबत बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांनी केवळ िधगाणा घालून सभागृहाचा वेळ वाया घातला. राज्यात १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना या प्रश्नावर विरोधी पक्षांनी चर्चा घडवून आणायला हवी होती, पण तसे झाले नाही.
पिचड म्हणाले, भंडारदरा धरणाच्या वरील भागातील कोकणात वाहून जाणारे साडेपाच टीएमसी पाणी अडवून प्रवरा व गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत चर्चा चालू असून, त्याचा फायदा नगर, नाशिक व मराठवाडय़ाला होईल. पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार अकोले येथे येणार असून तिथेही याबाबत ठोस भूमिका जाहीर करणार आहेत. भंडारदरा धरणातील पाण्याची गळती थांबण्यासाठी राज्य सरकारने ९० लाख रुपये मंजूर केले असून पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण होईल. प्रवरा नदीत प्रोफाईल वॉलला होणारा विरोध निर्थक असून त्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून त्यात अडविले जाणार आहे. भंडारदऱ्यातील एक थेंबही पाणी या प्रोफाईल वॉलमध्ये अडविणार नाही. काही लोक या प्रश्नाचे राजकारण करीत आहेत. आम्ही केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे प्रवरा आणि अशोकच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढत असल्याचा टोमणाही पिचड यांनी मारला.
निळवंडे कालव्यांची जबाबदारी झटकली
निळवंडे धरणाचे काम पुढील वर्षी शंभर टक्के पूर्ण होणार आहे. कालव्यांच्या कामांसाठी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी बघावे, हा त्यांचा प्रश्न आहे. अकोले भागात मात्र कालव्याची कामे सुरू असल्याचे पिचड यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2013 रोजी प्रकाशित
लोकसभेबाबत राष्ट्रवादीची शुक्रवारी बैठक
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र लढणार की स्वतंत्र याचा निर्णय राज्यात नव्हे तर दिल्लीत सोनिया गांधी व शरद पवार एकत्र बसून घेतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी सांगितले.

First published on: 24-04-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp parliamentary meeting held on friday