० शिवसेना नगरसेविकेच्या प्रभागातील प्रस्ताव नामंजूर
० ४० टक्के जादा रकमेमुळे नामंजुरीचा दावा
० धोकादायक शाळेतील विद्यार्थी संकटात
सर्वसमावेशक विकासाची भाषा करत नवी मुंबईचे सिंगापूर करण्याची भाषा करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी ऐरोली गावातील मोडकळीस आलेल्या जुन्या शाळेच्या पुनर्बाधणीचे कंत्राट बहुमताच्या जोरावर फेटाळल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका लता पुष्पराज कोटकर यांच्या प्रभागातील महापालिकेच्या जुन्या शाळेत सुमारे पाचशेहून अधिक गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची अवस्था अतिशय दयनीय बनली असून इमारतीचा काही भाग तर कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा पाडून त्याजागी नवी शाळा उभारणीसाठीचा सुमारे अडीच कोटी रुपयांचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीत मांडण्यात आला होता. मूळ अंदाजपत्रापेक्षा ४० टक्क्य़ांहून अधिक रकमेचा हा प्रस्ताव जादा रकमेचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी बहुमताच्या जोरावर फेटाळून लावल्यामुळे धोकादायक अवस्थेत उभ्या असलेल्या या शाळेची पुनर्बाधणी पुन्हा एकदा रखडणार आहे. शिवसेना नगरसेविकेच्या प्रभागातील हा प्रस्ताव असल्याने तो फेटाळण्यात आल्याचा आरोप आता विरोधी पक्षांकडून केला जात असून एरवी सर्वसमावेश विकासाची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी मुंबई महापलिकेतील स्थायी समिती सभेत बडय़ा रकमेचे अनेक वादग्रस्त कंत्राटांना यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दिलेली आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावातील काचेच्या शाळेवर झालेला कोटय़वधी रुपयांचा दौलतजादा काही वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरला होता. सुमारे २५ कोटींहून अधिक रकमेचा खर्च या शाळेवर करण्यात आला आहे. असे असताना शिवसेना नगरसेविकेच्या प्रभागातील शाळेचे कंत्राट जादा रकमेचे कारण पुढे करत सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी काही शाळांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विजय नहाटा यांनी या शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. नहाटा यांच्या बदलीनंतर शाळांच्या पुनर्बाधणीच्या प्रस्तावांचे प्रमाण मात्र कमी झाले. असे असले तरी ऐरोली गावातील शाळेच्या पुनर्बाधणीचा प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून अभियांत्रिकी विभागाच्या विचाराधीन होता. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून येथील शाळेची अवस्था दयनीय आहे. शाळेचा काही भाग धोकादायक असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महापालिकेने या शाळेच्या पुनर्बाधणीसाठी सुमारे एक कोटी ८८ लाखांच्या मूळ निविदा काढल्या होत्या. निविदेप्रक्रियेनंतर सुमारे ४० टक्के जादा रकमेचे कंत्राट स्थायी समितीपुढे मांडण्यात आले होते.
या जादा रकमेच्या कंत्राटाला राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध करत ठोस चर्चेविना हा प्रस्ताव फेटाळून लावला. पालकमंत्र्यांच्या गावातील शाळेवर कोटय़वधी रुपयांचा दौलतजादा सुरू असताना शिवसेना नगरसेविकेच्या प्रभागातील शाळेचा प्रस्ताव फेटाळून लावला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला आहे. नवी मुंबईच्या सर्वसमावेशक विकासाची भाषा करायची आणि दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातील प्रस्ताव फेटाळून लावायचे. हा दुटप्पीपणा राष्ट्रवादीकडून सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी स्थायी समिती सभेत केला.
दरम्यान ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक रकमेचे कंत्राट तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला, अशी माहिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी पत्रकारांना दिली. अधिक रकमेचे कंत्राट मंजूर केल्यावर टक्केवारीचे आरोप करायचे आणि ते फेटाळल्यास टीका करणे योग्य नाही, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांवरही दबाव
नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक पक्षातंर्गत दबावाला फारसे बळी पडत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र ऐरोली गावातील शाळेचा प्रस्ताव फेटाळला जावा, यासाठी महापालिकेतील एका बडय़ा पदाधिकाऱ्याने पालकमंत्र्यांवर दबाव वाढविल्याची चर्चा आता रंगली आहे. ऐरोलीत नगरसेवक असलेल्या या पदाधिकाऱ्याने हा प्रस्ताव स्वत:च्या राजकीय अस्तित्वाशी जोडत प्रतिष्ठेचा केला. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने पालकमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्याच्या दबावाला झुकते माप दिले आणि प्रस्ताव फेटाळावा, असे आदेश आपल्या नगरसेवकांना दिल्याचे बोलले जाते. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी मात्र पालकमंत्र्यांवर कोणताही दबाव नाही आणि आम्हाला विशिष्ट प्रकारचे आदेश नव्हते, असा दावा केला.