दुधगावकरांच्या आरोपाचा पाटील यांच्याकडून समाचार
तीर्थक्षेत्र विकासाचा निधी अन्यत्र वळविल्याचे कारण पुढे करीत जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांना आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादीच्या सदस्य अर्चना पाटील यांनी धमकी दिल्याचा आरोप दुधगावकर यांनी केला, तर बदनामी करणाऱ्या दुधगावकर यांच्यावर फौजदारी करणार असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दीड वाजता स्थायीच्या बैठकीस सुरुवात झाली. १३पैकी १२ सदस्य बैठकीस उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादीचे नानासाहेब जाधवर, अर्चना पाटील व मधुकर मोटे या तिघांचा समावेश होता. काँग्रेस, शिवसेना व भाजपाचे ९ सदस्य या वेळी उपस्थित होते. बैठकीत एकूण ४ विषयांवर चर्चा होणार होती. धारूर तीर्थक्षेत्राचा निधी चोराखळी येथे द्यावा, असा ठराव बांधकाम समितीने स्थायी समितीसमोर ठेवला. मात्र, त्यावरूनच वादाला तोंड फुटले. दरम्यान, स्थायी समितीची बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व धारूरचे रहिवासी घोषणाबाजी करीत बैठकीत शिरले. या वेळी अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला.
निधीचे कारण पुढे करीत अर्चना पाटील यांनी उपाध्यक्ष दुधगावकर यांना ‘तुम्हाला बघून घेऊ, अधिक शहाणपणा करू नका,’ अशी भाषा वापरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. स्थायीच्या बैठकीत अशा प्रकारे उद्धट वर्तन करणाऱ्या पाटील यांची तक्रार करणार असल्याचे दुधगावकर यांनी सांगितले.
अध्यक्षांच्या दालनात दुधगावकर यांना धमकी दिल्याचा प्रकार बाहेर समजताच काँग्रेस, शिवसेना, भाजपाचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी जि. प.त धाव घेतली. त्यामुळे तणाव वाढला. डॉ. व्हट्टे यांनी धारूरला तीर्थक्षेत्र निधीऐवजी जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्र्यांच्या सहमतीने १० लाख निधी रस्ता तयार करण्यास देऊ, असे लेखी आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला. मात्र, दुपारच्या घटनेवरून विविध नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2013 रोजी प्रकाशित
स्थायीच्या बैठकीत राष्ट्रवादीचा गदारोळ
तीर्थक्षेत्र विकासाचा निधी अन्यत्र वळविल्याचे कारण पुढे करीत जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांना आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादीच्या सदस्य अर्चना पाटील यांनी धमकी दिल्याचा
First published on: 07-03-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp rumpus in standing committee meeting