*  यू टर्नमुळे आश्चर्य
*  आयुक्तांना वगळून प्रशासनावर टीका कशी?
*  विकासकामांना गती मिळविण्यासाठी टीका केल्याचा दावा  
अर्थसंकल्पात भरीव तरतूद असूनही नगरसेवकांची लहान कामे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक रखडविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत एक प्रकारे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्यावर अप्रत्यक्षपणे प्रहार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी ‘आम्ही राजीव यांच्याविरोधात नाही, तर त्यांच्यासोबतच आहोत,’ अशी भूमिका मांडत प्रशासनाचे खच्चीकरण करण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा केला. प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे महापालिकेचा मागील वर्षांचा संपूर्ण अर्थसंकल्प कोलमडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केला होता. जगदाळे यांच्या आरोपामुळे स्फुरण चढलेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासन कामे करत नाही, असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. प्रशासन म्हणजे नेमके कोण, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लगेच सावरासावर करत ‘आम्ही आयुक्तांसोबत आहोत’, अशी भूमिका घेतल्याने महापालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला आहे.
ठाणे महापालिकेची निविदा प्रक्रिया अतिशय किचकट आणि वेळकाढूपणाची असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत महापालिकेच्या निविदा प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे नगरसेवकांची लहान कामे रखडली असल्याचा आरोपही जगदाळे यांनी केला. राजकीय अस्थिरतेमुळे अर्थसंकल्प उशिरा मंजूर झाला आणि त्यानंतर ठराव, अंमलबजावणीची प्रक्रियाही लांबली. प्रशासनाने जाणीवपूर्वक अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूद खर्च होणार नाही, असे कारस्थान रचल्याचा घणाघाती आरोपही जगदाळे यांनी केला होता.
 विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याने प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त आर. ए. राजीव यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोफ डागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे नगरसेवकांची कामे होत नाहीत, असा आक्षेप राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी नोंदविला होता. प्रशासन म्हणजे नेमके कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असताना शुक्रवारी राष्ट्रवादीने ‘यू टर्न’ घेत आम्ही आयुक्तांच्या विरोधात नाही, अशी भूमिका मांडल्याने यानिमित्ताने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
शहराच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही कामे करत असतो. त्यामागे कुणा एका व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा जगदाळे यांनी शुक्रवारी केला. आयुक्त राजीव शहरात विकासाचे काम करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष त्यांच्यासोबत आहे, असेही जगदाळे यांनी स्पष्ट केले. स्थायी समितीत झालेल्या चर्चेत प्रशासनाला कमकुवत करणे किंवा त्याचे खच्चीकरण करण्याचा उद्देश नव्हता, असेही ते म्हणाले. व्यक्तिगत कामासाठी संरक्षण मिळावे यासाठी आयुक्त किंवा प्रशासनाला अडचणीत आणण्याचा आमचा उद्देश नसतो, असा दावाही जगदाळे यांनी केला आहे.