मुद्रांक व नोंदणी विभागाची ऑनलाईन हेल्पलाईन
विविध दस्तऐवजांच्या नोंदणीकरिता नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, आवश्यक ती माहिती सहज व कमी वेळात मिळावी व नोंदणी कार्यालयांमध्ये होणारी त्यांची अडवणूक थांबावी, यासाठी राज्य शासनाच्या मुद्रांक व नोंदणी विभागाने ऑनलाईन हेल्पलाईन सुरू केली आहे. ‘सारथी’ नावाने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा उद्देश नोंदणी व्यवहाराबद्दल माहिती पुरवून या कार्यालयांमध्ये होणारे गैरप्रकार थांबवणे असून गेल्या तीन महिन्यात एक लाखाहून अधिक लोकांनी या उपक्रमाच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे. या विभागाने आता सारथी व नागरिकांची सनद या ऑनलाईन उपक्रमांचा प्रचार करण्याचे ठरवले असून अधिकाधिक नागरिकांचे प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाने ऑगस्टमध्ये या ऑनलाईन उपक्रमाला सुरुवात केली. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व त्यानंतर दिवाळीमुळे या उपक्रमाची विशेष प्रसिद्धी होऊ शकली नाही. आता ‘सारथी’च्या प्रचार-प्रसाराला विभागाने प्रारंभ केला असून अधिकाधिक नागरिकांना याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विभागाशी संबंधित विविध विषयांची माहिती सारथी पुस्तक, संकेतस्थळ, पीडीएफ बुक, इ-बुक व मोबाईल अॅप या ५ माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ६६६.्रॠ१ेंँँी’स्र्’्रल्ली.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, विभागाशी संबंधित कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ८८८८००७७७७ हा हेल्पलाईन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे, तसेच कामकाजात होणारा विलंब टाळण्यासाठी असलेली नागरिकांची सनदही ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ९ नोव्हेंबपर्यंत १ लाखापेक्षा जास्त लोकांनी सारथी उपक्रमाचा लाभ घेतला असून संकेतस्थळ, पीडीएफ बुक, कॉल सेंटर, पुस्तक, मोबाईल अॅप व इ-बुकच्या माध्यमातून लागणारी माहिती मिळवली आहे.
कमीतकमी वेळात व सहज कामे व्हावीत, अशी लोकांची अपेक्षा असते. नोंदणी व मुद्रांक विभागात अनेकांची कामे असतात. मात्र, पुरेशा माहितीअभावी सामान्य लोकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. एकाच कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयात वेगवेगळी कागदपत्रे मागितली जातात. लोकांची कामे लवकर व्हावी, अडचणी आल्यास तक्रारी दाखल करता याव्यात व एकंदर व्यवहार सुलभ व्हावे, यासाठी सारथी उपक्रम उपयोगी ठरणार आहे. कोणत्या कामासाठी कोणती कागदपत्रे लागतील, हे निश्चित करण्यात आले आहे व त्याची माहितीही उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्थानिक स्तरावर आलेल्या अडचणींबाबत ऑनलाईन तक्रार केल्यास महानिरीक्षक स्तरावर याची दखल घेण्यात येईल. अशा तक्रारींचा दर आठवडय़ाला आढावा घेण्यात येऊन स्थानिक कार्यालयांना ते प्रश्न सोडविण्याबाबत सूचना करण्यात येतील.
‘तीन महिन्यात
२४७ तक्रारींचा निपटारा’
माहिती उपलब्ध होत असल्याने नागरिकांचे या माध्यमातून सक्षमीकरण होणार आहे. त्यामुळे त्यांना मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागणार नाही. नागरिक व सरकारी यंत्रणा अशा दोघांचाही त्रास यामुळे कमी होणार असून कायदेशीररीत्या होणाऱ्या कामांमध्येही वाढ होणार आहे, असे राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रीकर परदेशी यांनी सांगितले. ‘सारथी’च्या माध्यमातून तीन महिन्यात ४०८ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी २४७ तक्रारींचे निवारण केले असून ६० तक्रारींना तात्पुरते उत्तर दिले आहे. उर्वरित तक्रारींचीही दखल घेऊन पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.