काटोल उपविभागातील सर्व अ‍ॅसिड विक्रेत्यांनी अ‍ॅसिड साठा व विक्री संदर्भात अभिलेख ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी अविनाश कातडे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयातील फौजदारी रिट याचिका क्रमांक १२९/२००६ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार अ‍ॅसिडची खुली विक्री पूर्णत: प्रतिबंधित करण्यात आली आहे. जोपर्यंत विक्रेता नोंदवहीवर नोंद घेऊन ज्या व्यक्तीस अ‍ॅसिडची विक्री केली आहे, त्याचा पत्त्यासह पूर्ण तपशील ठेवणे आवश्यक आहे. १८ वर्षांच्या खालील व्यक्तीस अ‍ॅसिड विक्री करता येणार नाही. अ‍ॅसिड विक्रेत्यास खरेदीदाराचे शासनाने दिलेले ओळखपत्र घेणे बंधनकारक आहे. अ‍ॅसिड खरेदीसंदर्भातील तपशील घेणे बंधनकारक आहे. अ‍ॅसिडचा साठा अ‍ॅसिड विक्रेता ३० एप्रिल २०१४ पर्यंत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे लेखी सादर करणे बंधनकारक आहे. तसेच विक्री व साठय़ाबाबत मासिक अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. ३० एप्रिल २०१४ नंतर जाहीर न केलेला अ‍ॅसिड साठा निदर्शनास आल्यास जप्त करून ५० हजार रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येईल, असे नमूद केले आहे.
शैक्षणिक संस्था, संशोधन प्रयोगशाळा, दवाखाने, शासकीय, निमशासकीय विभागात येणारी कार्यालये यांनीसुद्धा अ‍ॅसिड साठय़ाबाबत नोंदवहीत नोंद घेऊन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना साठय़ाबाबतचा अहवाल पाठविणे बंधनकारक आहे.