शहर परिसरातील वसाहतीमध्ये पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचा फायदा चोरटे घेऊ लागले असू नववसाहतींमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त घालताना नेहमीपेक्षा वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज रहिवाशांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
शहराची वाढ चौफेर होऊ लागली असली तरी त्या प्रमाणात पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना शर्त करावी लागत आहे. पोलिसांकडून रात्रीची गस्त नेहमीच्या ठराविक मार्गाने घातली जात असल्याने ही गस्त फारशी परिणामकारक ठरत नाही. शहराजवळील नववसाहतींमध्ये होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी या वसाहतींमध्येही पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक झाले आहे. उदाहरणार्थ पंचवटीतील हनुमाननगर, विडी कामगारनगर, लक्ष्मीनगर, औदुंबरनगर यांसह धात्रक फाटा परिसरातील नववसाहती, रासबिहारी चौफुलीपासून म्हसरूळकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झालेल्या नववसाहती या भागात पोलिसांनी गस्त वाढविण्याची गरज आहे.
रासबिहारी चौफुली ते म्हसरूळ रस्त्यावर महिलांचे दागिने हिसकावून पळ काढण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने पोलिसांनी दिवसाही गस्त घालण्याची आवश्यकता आहे.
चोरटय़ांना पळण्यासाठी या रस्त्याने अनेक मार्ग उपलब्ध असल्याने चोरटे त्याचा फायदा उठवितात. लक्ष्मीनगर परिसरातील काही बंगल्यांमध्ये अवैधपणे जुगारही खेळला जात असल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांनी रात्री दहानंतर वसाहत परिसरात रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांची चौकशी केल्यास ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर आळा बसण्यास मदत होईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.