डेंग्यु नंतर शहरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोकेवर काढले असून शहर परिसराला स्वाईन फ्लूचा पडलेला विळखा लक्षात घेत आरोग्य विभाग सजग झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात १२ खाटांचा नवीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. महापालिका व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांत आवश्यक औषधसाठय़ासह अन्य साहित्य पुरविण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून नागरीकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक ठरणारा ‘जी १ एन १’ मास्क बाजारात उपलब्ध नसून सर्वसाधारण मास्कचा वापर सुरू आहे.
मागील वर्षी स्वाईन फ्लूची वाढती तीव्रता पाहता आरोग्य विभाग कार्यप्रवण झाला आहे. नागरीकांनी खबरदारी घेतल्याने परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्वाईन फ्लुने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नाशिकचा विचार केला तर आतापर्यंत  साधारणत महिनाभरात चार रुग्ण दगावले असून अन्य रुग्ण हे स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने त्रस्त असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. या पाश्र्वभूमीवर, महापालिका, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग या त्रिस्तरीय यंत्रणेकडून सहा हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात चार हजार २८० रुग्णांमध्ये स्वाईन फ्लुची लक्षणे आढळून आली तर २१ रुग्ण स्वाईन फ्लू आजाराने ग्रस्त असल्याचे लक्षात आले. जिल्हा रुग्णालयात या आधी स्वाईन फ्लू कक्ष कार्यान्वित करण्यात आला. या ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर, आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन १२ खाटांचा नवीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच खासगी रुग्णालयातील स्वाईन फ्लु सदृश्य आजाराने ग्रस्त रुग्णांची माहिती देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना या संदर्भात तपासणी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. नागरीकांनीही दक्षता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
स्वाईन फ्लूपासुन बचाव व्हावा यासाठी आवश्यक असणारे निलगिरी तेल आणि मास्कचा तुटवडा सध्या निर्माण झाला आहे. या  आजारापासून बचाव व्हावा म्हणून जी १ एन १ मास्कला चांगलीच मागणी आली आहे. परंतु, सध्या नाशिकमध्ये हा मास्क उपलब्ध नाही. मुंबई येथे मागणी केली असून लवकरच हे मास्क उपलब्ध होतील. ‘जी १ एन १’ उपलब्ध नसल्याने साधे मास्क घेतले जात असल्याचे विक्रेते योगेश बारगेचा यांनी सांगितले.