विविध कारणांनी प्रदीर्घ काळ रखडलेले जिल्हा न्यायालयाच्या बांधकामास आता ठिकाण बदलून प्रारंभ झाला आहे. जिल्हाच नव्हे तर नाशिकसह राज्यातील दोन, तीन महसुली विभागातील सर्वात मोठय़ा व अत्याधुनिक अशा या इमारतीने नगर शहराच्या वैभवात मोठी भर पडेल असे हे काम मे १४ पर्यंत म्हणजे दीड वर्षांत पुर्ण करण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्य़ातील ही पहिलीच बहुमजली सरकारी इमारत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयामागील न्यायनगर येथे या जागेची निश्चिती झाल्यानंतर इमारतीचा आराखडा तयार करून त्याबरहुकूम काम सुरू झाले आहे. तळमजला अधिक पाच मजले अशी ही जिल्ह्य़ातील पहिलीच सहामजली इमारत आहे. शिवाय तळघरात न्यायधीशांच्या वाहनांसाठी खास वाहनतळ करण्यात येणार आहे. तब्बल दोन लाख १५ हजार स्क्वेअरफुटांचे आकर्षक बांधकाम या जोगवर सुरू आहे. इमारतीवर लहानमोठय़ा १४ घुमटांची (डोम) रचना करण्यात आली आहे. इमारतीसाठी तब्बल २९ कोटी ५९ लाख ९८२ रूपयांचा निधीही वर्ग झाला आहे.
दिवाणी व फौजदारी अशी एकुण ५० न्यायालये, या सर्व न्यायाधीशांची दालने, प्रशासकीय कार्यालये, सरकारी वकिलांचे कार्यालय, प्रत्येक न्यायालयासमोर पक्षकारांसाठी स्वतंत्र अभ्यागत कक्ष, आरोपी व गुन्हेगारांसाठी स्वतंत्र व प्रशस्त कक्ष अशी या इमारतीची रचना आहे. न्यायाधीशांसाठी सहा आणि पक्षकार, वकिल, नागरिकांसाठी सहा अशा तब्बल बारा लिफ्ट या इमारतीत आहेत. शिवाय वेगवेगळ्या दिशांना दहा जिनेही बांधण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे न्यायाधीश व पक्षकार, वकिलांची थेट न्यायालयातच दृष्टादृष्ट होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळात वाहन पार्क केल्यानंतर थेट दालनात जाईपर्यंत न्यायाधीशांना कोणताही व्यत्यय येणार नाही अशी ही रचना आहे. हेच या इमारतीचे वैशिष्ठय़ ठरेल असा विश्वास बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. एस. पवार यांनी व्यक्त केला. त्यांच्याच देखरेखीखाली हे बांधकाम सुरू आहे.  
मुबंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती अंबादास जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. डी. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्री. वानखेडे यांनी स्वत: या इमारतीच्या कामात पुढाकार घेऊन विविध सुचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता हरिष पाटील व कार्यकारी अभियंता ए. एस. खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम सुरू आहे, त्यांच्याच पुढाकारातून इमारतीची आकर्षक प्रतिकृतीही तयार करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता एम. व्ही. बनसोडे यांनी दिली.