नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्या, होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नव्याने भर पडणारे प्रकल्प, वाढती पोलीस ठाण्याची संख्या या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने तिसऱ्या परिमंडळाची आणि शहरालगतचा खालापूर व रसायनी परिसर आयुक्तालय क्षेत्रात जोडण्याची मागणी करणारा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपूर्वी गृहविभागाकडे पाठवला आहे.
तिसऱ्या परिमंडळामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र विस्तारण्याबरोबरच कर्मचारी बळदेखील वाढणार आहे. मात्र या प्रस्तावावर अद्याप गृहविभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातच आगामी लोकसभा निवडणुकीनंतर यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याने नवीन परिमंडळासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.
मुंबईची जुळी बहीण म्हणून नवी मुंबई शहर ओळखले जाते. सिडकोच्या माध्यमातून १९७० मध्ये नवी मुंबईच्या निर्मितीस सुरुवात झाली. नियोजनबद्घ असलेली नगरी झपाटय़ाने विस्तारली. सायबर सिटी, एज्युकेशन हब म्हणून ओळखली जाऊ लागली.
आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी आणि आयटी कंपन्यांमुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली. १९९४ पूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून रबाले, तुभ्रे पोलीस ठाणे कार्यान्वित होती.
यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्वतंत्र उभारणी करण्यात आली. आता दिघा ते उरण असा जवळपास ७०० चौ.कि.मी.चा परिसर या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहे. एपीएमसी, दिघा ते बेलापूर आणि तळोजा एमआयडीसी परिसर, सायन-पनवेल आणि ठाणे-बेलापूर हे प्रमुख रस्ते, आयटी पार्क, जेएनपीटी, तळोजा मध्यवर्ती कारागृह, वाशी ते उरण लाभलेल्या सागरी किनाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर टप्प्याटप्प्याने नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात आली. यात मोरा आणि एनआरआय या दोन सागरी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
एमआयडीसी परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तुभ्रे आणि रबाले पोलीस ठाण्यांचे विभाजन करीत स्वतंत्रपणे दोन एमआयडीसी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर खांदेश्वर आणि कामोठे या दोन नवीन पोलीस ठाण्यांची यात भर पडली. शहरात असलेले उद्योगधंदे, उत्तम निवासाची सोय, मुबलक पाणी, शैक्षणिक संस्थांचे पसरलेले जाळे, दळणवळणाची साधने, मुंबई-ठाणे-पुणे यांच्या मध्यवर्ती असलेल्या नवी मुंबईच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. यातच या ठिकाणी प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल, सागरी सेतू आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरीकरणात सातत्याने मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या १ आणि २ परिमंडळ (पोलीस उपायुक्त) आहेत. परिमंडळ १ मध्ये दिघा ते बेलापूर आणि परिमंडळ दोनमध्ये खारघर ते उरण पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. मात्र नवीन पोलीस ठाण्यांची पडलेली भर आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे वाढणारे नागरीकरण आदींच्या पाश्र्वभूमीवर नवीन परिमंडळाच्या निर्मितीचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाने तयार केला आहे.
याचबरोबर शहरात वाढते आíथक गुन्ह्य़ांचे प्रमाण पाहता स्वतंत्र ‘आíथक गुन्हे विभाग’ उभारण्याची मागणीदेखील करण्यात आली. यासाठी एक पोलीस उपायुक्त आणि एक साहाय्यक पोलीस आयुक्त आणि कर्मचारी वर्गाची मागणी यात करण्यात आली आहे. याचबरोबर परिमंडळ २ मधील साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे ६ पोलीस ठाण्यांचा भार आहे. त्यामध्ये एका पोलीस ठाण्याची भर पडली असून यासाठी आणखी एका साहाय्यक पोलीस आयुक्तांची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. सिडकोचे कार्यक्षेत्र असलेले खालापूर आणि रसायनी या दोन परिसरांचा समावेश पोलीस आयुक्तालयात करण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे.
या संदर्भात अप्पर पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आला असून अद्याप प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाणे
वाशी, एपीएमसी, रबाले,
कोपरखैरणे, तुभ्रे, नेरुळ,
एनआरआय, सीबीडी,
खारघर, तळोजा, कळंबोली,
नवीन पनवेल,
पनवेल शहर, उरण,
न्हावा-शेवा, मोरा कोस्टल ठाणे,
नवीन पोलीस ठाणे
रबाले एमआयडीसी,
तुभ्रे एमआयडीसी, कामोठे आणि खांदेश्वर पोलीस ठाणे. नवी मुंबई पोलीस ठाणे कार्यक्षेत्र-दिघा ते उरण
आयुक्तालयातील प्रमुख नगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिका
पनवेल नगर परिषद
उरण नगर परिषद
आयुक्तालय हद्दीतील प्रमुख ठिकाणे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल.
ठाणे-बेलापूर एमआयडीसी
तळोजा एमआयडीसी
सिडको गोल्फ कोर्स
कोकण आयुक्त विभागीय कार्यालय
सिडको भवन
केंद्रीय भवन
केंद्रीय कपास भवन
निर्मल भवन
भारतीय रिझव्र्ह बँक इमारत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ
नवी मुंबई महानगरपालिका
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)
सायन-ठाणे-पनवेल-पुणे महामार्ग
प्रस्तावित परिमंडळाची रचना
परिमंडळ १
रबाले, रबाले एमआयडीसी, कोपरखैरणे,
वाशी, एपीएमसी, नेरुळ पोलीस ठाणे
परिमंडळ २
तुभ्रे, तुभ्रे एमआयडीसी, खांदेश्वर, कामोठे
एनआरआय, बेलापूर, खारघर पोलीस ठाणे
परिमंडळ ३
कळंबोली, तळोजा, पनवेल, पनवेल शहर, उरण, न्हावा-शेवा, मोरा कोस्टल पोलीस ठाणे.
स्वतंत्र आíथक गुन्हे विभाग
१ पोलीस उपायुक्त, १ साहाय्यक पोलीस आयुक्त, १ पोलीस निरीक्षक व कर्मचारी.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2014 रोजी प्रकाशित
नवी मुंबई पोलीस तिसऱ्या परिमंडळाच्या प्रतीक्षेत!
नवी मुंबई शहराची वाढती लोकसंख्या, होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नव्याने भर पडणारे प्रकल्प, वाढती पोलीस ठाण्याची संख्या या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने तिसऱ्या
First published on: 08-03-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New mumbai police