कोणतेही काम न करता २८ हजार रूपये थेट एखाद्याच्या खात्यात जमा करण्याचा चमत्कार करणारे जिल्हा प्रशासन दुसरीकडे जे कित्येक दिवस राबराब राबले, त्यांना महिना उलटूनही मोबदला देण्यास तयार नसल्याचे वास्तव ऐन दुष्काळी परिस्थितीत पुढे आले आहे. शेतात कामच नसल्याने रोजगाराच्या आशेने रोजगार हमी योजनेवर अर्थात मरेगा अंतर्गत काम करणाऱ्या शेकडो आदिवासी ग्रामस्थांना प्रशासनाच्या या धोरणामुळे दुष्काळाबरोबर आर्थिक चटकेही सहन करावे लागत आहेत. महत्वाची बाब म्हणजे, होळी हा आदिवासी बांधवांसाठी सर्वात महत्वाचा सण असताना रोजगाराचा मोबदला मिळत नसल्याने ‘शिमगा’ करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे दिसत आहे. दुष्काळग्रस्तांसाठी राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाची ही अवस्था प्रशासन दुष्काळ निवारण्यार्थ किती असंवेदनशील आहे, त्याचे उदाहरण म्हणता येईल.
राज्यातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर, शासनाने ग्रामीण भागात रोजगार हमी योजना अर्थात मरेगा अंतर्गत दुष्काळग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता मोठय़ा प्रमाणात कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन ही कामे तर सुरू करते, मात्र, त्याचे पैसे देण्यास दिरंगाई करत असल्याचे चित्र आहे. हरसुल तालुक्यातील ठाणापाडा गावातील मोबदला मिळण्याची प्रतीक्षा करणारे ३०० ग्रामस्थ हे त्याचे निदर्शक होय. यासारखी स्थिती जिल्ह्यातील इतर भागातही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणापाडा येथे शेततळे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्या कामात ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील ३०० जणांनी सहभाग नोंदविला. खरशेत येथे तीन, जांभुळपाडा येथे तीन आणि सावरपाडा येथे १ असे एकुण सात शेततळे तयार करण्यात आले. या शेततळ्यांचे काम पूर्णत्वास जाऊन महिन्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी अद्यापही संबंधितांना आपल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य अंबादास पवार व रघुनाथ दळवी यांनी सांगितले. कामाचा मोबदला देण्यास संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या संदर्भात विचारणा केल्यास मस्टर दिले आहे, पोस्टात बिले पाठविली आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जाते. महिनाभराहून अधिक काळ प्रतीक्षा करणाऱ्या आदिवासी बांधवांना आता होळीपर्यंत तरी किमान हे पैसे हाती पडतील की नाही याची धास्ती वाटत आहे. आदिवासी भागात होळीला दिवाळीइतके किंबहुना अधिक महत्व आहे. होळी अर्थात शिमगा जवळ आल्याने ग्रामस्थांची अस्वस्थता वाढली आहे. होळीच्या काळात पाच दिवस परिसरात मोठी जत्रा असते मात्र, होळीची पूर्वतयारी करण्यासाठी हाती पैसे नसल्याने यंदा ‘संक्रांत’ येणार असल्याची अगतिकता अनेकांनी व्यक्त केली. या संर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या ठिकाणी तक्रार करायची म्हटली तरी भाडय़ापोटी १२० रूपयांची पदरमोड करावी लागते. इतके करूनही पहिल्या भेटीत काम होईल, याची शाश्वती नसल्याचे पवार यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, गावातील काही ग्रामस्थ जे प्रत्यक्षात या कामावर नव्हते, त्यांच्या खात्यांवर हजारो रूपये जमा झाल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे. सावरपाडा येथील मावंजी लहानु दाव्हाड यांनी कुठलेही काम केले नसताना त्यांच्या खात्यावर याच पद्धतीने २८ हजार रूपये जमा झाले, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. म्हणजे, ज्यांनी काम केले त्यांना अद्याप एक दमडीही न देणाऱ्या शासकीय यंत्रणेने ज्यांचा या कामात प्रत्यक्ष सहभाग होता, त्यांना ऐन दुष्काळ आणि सणोत्सवात अक्षरश: वाऱ्यावर सोडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काम करूनही त्याचा मोबदला मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात खेटा मारण्याचा अनुभव मरेगा प्रमाणे वनविकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात आलेल्या कामांमध्ये सहभागी झालेले ग्रामस्थही घेत आहेत. वनविभागाने गतवर्षीची प्रलंबित कामे यावर्षी पूर्ण केली. ही कामे पूर्णत्वास जाऊन पाच महिन्यांहून अधिक कालावधी झाला असूनही संबंधितांना अद्याप पैसे मिळाले नाही.