लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथील तीन मुलींची हत्या करण्यापूर्वी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर निष्पन्न झाले होते. नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार, हत्या, पुरावा नष्ट करणे अशा पद्धतीच्या गुन्ह्य़ाचंी नोंद पोलिसांनी त्या आधारावर केली होती. संपूर्ण देशवासीयांचे लक्ष या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या प्रकरणाकडे वेधले असताना फॉरेन्सिक अहवालाने मात्र प्रशासनाची तारांबळ उडवून दिली आहे. बलात्कार झाला नसल्याची बाब फॉरेन्सिक अहवालाकडे पुढे आली असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळालेले आहे.
शवविच्छेदन करण्यासाठी फॉरेन्सिकतज्ज्ञ असणे आवश्यक होते अशा तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत शवविच्छेदन केले होते. त्यातही फक्त पदविका उत्तीर्ण असलेल्या दोघांची शवविच्छेदनासाठी मदत घेण्यात आली होती. प्राथमिक शवविच्छेदन अहवालावरून मृत्यू झाल्याचे कारण कळू शकले नसून त्या मुलींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे डॉक्टरांवर हे प्रकरण उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाखनीमध्ये या प्रकरणामुळे पुन्हा हालचाल झालेली सुरू झालेली असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी लाखनी, मुरमाडी आणि स्थानिक महिला बचत गटांच्या महिलांची बैठक घेऊन तिन्ही मुलींवर बलात्कार झाला नसल्याचे त्यांना फॉरेन्सिक अहवालात निष्पन्न झाल्याची माहिती दिली. महिलांनी आता संयम बाळगून तपासाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नागपूर पोलीस महानिरीक्षक राजेंद्रसिंग यांनी मृतक मुलींचे मामा अरुण गोतमारे यांना चौकशीसाठी बोलाविले होते. पोलिसांच्या तपासाची सुई आता फॉरेन्सिक अहवालाच्या अहवालावरून वेगळ्या दिशेने वळविण्यात आली आहे. या तीनही मुलींच्या तीन वाजेपर्यंतच्या घटनेच्या दिवशी अस्तित्वाच्या नोंदी पोलिसांना मिळालेल्या आहेत. मुलींना दुकानात जाऊन खाऊ विकत घेणे, मैत्रिणीकडे जाणे, मामाने बोलाविणे या नवीन बाबी पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे हा मामा कोण, अशी चर्चा गावात होऊ लागली आहे.  इतकी गंभीर आणि संवेदनशील घटना असताना तज्ज्ञ डॉक्टरच्या अनुपस्थितीत तिन्ही मुलींचे शवविच्छेदन केले कसे? या प्रश्न निर्माण होत आहे. फॉरेन्सिक अहवालावरून जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह यांना ‘त्या’ तीनही मुलींवर बलात्कार झाला नसल्याचे कळविण्यात आले असून फॉरेन्सिक अहवालानुसार तपासाची दिशा ठरविण्यात येईल, असे डॉ. आरती सिंह यांनी म्हटले आहे.