सलग दुसऱ्या वर्षी पडलेला अपुरा पाऊस व त्यातच योग्य नियोजनाभावी उजनी धरणाने गाठलेला तळ, यामुळे सोलापूर शहराला गेल्या तीन महिन्यांपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु सुदैवाने यंदा पावसाळ्यात वरूणराजाने केलेली कृपा व उजनी धरणात वाढत चाललेला पाणीसाठा पाहता सोलापूरकरांना उद्या सोमवारपासून तीन दिवसाआड ऐवजी पूर्वीप्रमाणे दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर धरणातील पाणीसाठय़ात आणखी सुधारणा झाली तर शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाआड करणे शक्य होणार आहे.
सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उजनी धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे केला जातो. याशिवाय विजापूर रस्त्यावरील टाकळी येथे भीमा नदीच्या बंधाऱ्यावरून तसेच तुळजापूर रस्त्यावरील एकरूख तलावाचा पाणीपुरवठा होतो. शहराला दररोज १२० एमएलडी पाणी लागते. परंतु मागील सलग दोन वर्षांत अपुऱ्या पावसामुळे व उजनी धरणात पाण्याचा साठा तळ गाठल्याने शहरातील पाणी योजनेची स्थिती नाजूक बनली होती. त्यातच एकरूख तलावातील पाणीसाठा संपत आल्याने दुष्काळात तेथून पाणी सोडणे बंद झाले होते. मात्र आता सुदैवाने जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस पडू लागला असून उजनी धरणातही वजा ५० टक्क्य़ांवरून ३० टक्क्य़ांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. टाकळी येथील बंधाऱ्यातही साडेचार मीटर पाण्याची पातळी कायम आहे.  तर एकरूख तलावातील पाण्याची पातळीही हळूहळू वाढू लागल्याने तेथून पाण्याचा उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सोलापूरच्या पाणीपुरवठा योजनेसाठी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उजनी धरणात पाण्याचा साठा झपाटय़ाने वाढू लागला असून येत्या काही दिवसात पाणीसाठा ७०ते ८० टक्क्य़ांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साहजिकच सोलापूरचा पाणीपुरवठा दोन दिवसाआडऐवजी एक दिवसाआड होण्याची अपेक्षा आहे.