पूर्णा धरणाचे पाणी सोडण्याच्या नावाखाली पालकमंत्र्यांनी सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीनिमित्त अधिकाऱ्यांची पुन्हा मुंबईवारी होणार आहे. मात्र, या बाबत आता अधिकारीवर्गातही दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे.
जिल्ह्य़ातील विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घ्याव्यात, अशी सामान्यांची अपेक्षा असते. परंतु अन्य महत्त्वाच्या दिवशी झेंडावंदना निमित्ताने पालकमंत्र्यांना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे घाईगडबडीत रेल्वेचे वेळापत्रक समोर ठेवून होणाऱ्या बैठका व जिल्हा नियोजनाची वार्षिक सभा वगळता अलीकडच्या काळात बहुसंख्य बैठका पालकमंत्री मुंबईतच घेतात. पाणीटंचाई प्रश्नावर पालकमंत्र्यांनी ६ मार्चला बैठक घेतली.  त्यानंतर डीपीडीसी अंतर्गत जनसुविधा विषयावर जि. प.चे पदाधिकारी, अधिकारी यांची १८ मार्चला बैठक घेतली. आता पुन्हा १५ एप्रिलला पूर्णा धरणाचे पाणी सोडण्याबाबत मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.