भाजप प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्याबरोबर अकोल्यातील भाजपची महानगर कार्यकारिणी गुरुवारी घोषित करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर अकोल्यातील भाजप कार्यकारिणीची घोषणा होईल, असे भाकित लोकसत्ताने २ एप्रिल रोजी प्रकाशित वृत्तात केले होते. ते आज खरे ठरले.
दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या महानगर कार्यकारिणीत कुठलाही मोठा बदल नसून जुनीच कार्यकारिणी नव्याने घोषित केल्याची चर्चा पक्षात होती, तर ग्रामीण विभागाची कार्यकारिणीची घोषणा झाली नसून ती रामनवमी रोजी होईल. अशी माहिती आहे.
अकोला भाजप महानगर कार्यकारिणीची काल घोषणा झाली. यात ११ डॉक्टर्स, ४ वकील, ५ नगरसेवक, ५ माजी नगरसेवक, २५ उद्योजक, ओबीसी प्रवर्गातून ३८ लोकांचा, तर ४६ महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले. या कार्यकारिणीत महानगराध्यक्षपदी डॉ.अशोक ओळंबे, उपाध्यक्ष पदी डॉ.किशोर मालोकार, सुनील कोरडीया, डॉ. विनोद बोर्डे, अ‍ॅड. सुभाषसिंह ठाकूर व इतरांचा समावेश करण्यात आला आहे, तर गेल्या वेळी असलेले सरचिटणीस कायम ठेवण्यात आले आहेत. यात किशोर मांगटे, डॉ.युवराज देशमुख, दीपक मायी यांचा समावेश आहे. चिटणीसमध्ये भाजप युवा नेते सागर शेगोकार व मनीष बाछूका यांच्यासह इतरांचा समावेश करण्यात आला आहे. तर मूर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे दावेदार श्रीप्रभू चापके यांच्या पत्नी जयश्री यांना चिटणीस करूत पक्षाने योग्य ते संकेत दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिध्दी प्रमुख असलेले गिरीश जोशी कायम ठेवण्यात आले असून अनेक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा दांडगा जनसंपर्क पक्षनेतृत्वाने हेरल्याचे स्पष्ट होत आहे.

पडलेले महानगर बुथ प्रमुख
गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीत भाजप बंडखोर विजय अग्रवाल यांनी भाजप उमेदवार गिरीश गोखले यांचा पराभव केला होता. महापालिकेत गिरीश गोखले हे पडलेले उमेदवार असताना पक्षाने थेट महानगर बुथ प्रमुख म्हणून घोषित केल्याने पक्षात जोरदार चर्चेला उधाण आले आहे. जे महापालिका निवडणुकीत पराजित झाले त्यांना इतकी मोठी जबाबदारी देऊन पक्षाने काय साध्य केले, असा प्रश्न पक्षातील काही नेत्यांनी उपस्थित केला. भविष्यातील लोकसभा व विधानसभा निवडणूक पाहता गोखले या पदास कितपत न्याय देतील, असा प्रश्न उपस्थित होतो. विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघात यशस्वी कामामुळे ही नियुक्ती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली, पण विजय अग्रवाल यांच्या विरोधात पडलेले उमेदवार म्हणूनच ते अधिक परिचित आहेत.