‘मविप्र’तर्फे ‘ऑलिम्पिक डे रन’

जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधत नाशिककरांना सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने ऑलिम्पियन कुस्तिपटू नरसिंग यादव यांच्या प्रमुख

जागतिक ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधत नाशिककरांना सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने ऑलिम्पियन कुस्तिपटू नरसिंग यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी सात वाजता ‘ऑलिम्पिक डे रन’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संस्थेच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘मॅरेथॉन’ शिल्पाचे अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे.
संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. हेमंत पाटील यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. ‘ऑलिम्पिक डे रन’ सोहळ्यास महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय जिल्ह्य़ातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षी २३ जून रोजी ऑलिम्पिक डे रन काढली जाणार असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी जाहीर केले आहे. यानिमित्त ऑलिम्पिक डे स्लोगन स्पर्धाही ठेवण्यात आली आहे.
यंदाच्या या ऑलिम्पिक डे रनचे वैशिष्टय़ म्हणजे प्रमुख पाहुण्यांऐवजी धावपटूंना हिरवा झेंडा दाखविण्याची कामगिरी संस्थेतील सवरेत्कृष्ट खेळाडू करणार आहेत. या खेळाडूंमध्ये राहुल अगवणे (धनुर्विद्या), दुर्गा देवरे, दत्ता बोरसे (धावपटू), स्वप्निल गीते (खो खो), अस्मिता दुधारे, जय शर्मा, स्नेहल विधाते (तलवारबाजी), राजश्री शिंदे, राजेंद्र शिंदे (व्हॉलीबॉल) यांचा समावेश आहे. या रनसाठी एक किलोमीटर अंतर ठरविण्यात आले असून, गंगापूर रस्त्यावरील मविप्र मॅरेथॉन चौकापासून धावण्यास सुरुवात होईल. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या चौकास फेरी मारून पुन्हा मविप्र मॅरेथॉन चौक असा हा रनचा मार्ग आहे. सर्वासाठी हा रन खुला असल्यामुळे नाशिककरांनी मोठय़ा संख्येने यामध्ये सामील होण्याचे आवाहन प्रा.पाटील यांनी केले.
दरम्यान, संस्थेच्या वतीने १५ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेची कायमस्वरूपी ओळख निर्माण व्हावी, नाशिकची क्रीडाविश्वात वेगळी ओळख व्हावी, यासाठी संस्थेने खास ‘मॅरेथॉन’ शिल्पाची उभारणी मॅरेथॉन चौकात केली असून, या शिल्पाचे अनावरणही यावेळी होणार आहे. यावेळी रनची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन संस्थेचे शिक्षणाधिकारी एस. के. शिंदे, सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ, बी. डी. शिंदे, क्रीडा शिक्षिका मीनाक्षी गवळी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
मानसिंग ढोमसे यांच्या हातातील जादू
चित्रकार व शिल्पकार अशी ओळख असलेल्या मानसिंग राजाराम ढोमसे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसाठी ‘मॅरेथॉन’ शिल्प तयार केले आहे. ‘फायबर’मधील हे शिल्प तयार करताना त्यातून वेग जाणवेल याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली असून, अनावरण झाल्यानंतर नाशिककरांना या शिल्पातील सौंदर्याची अनुभूती येईल. अवघ्या दोन महिन्यांच्या अवधीत ढोमसे यांनी हे शिल्प तयार केले आहे.
गोरठाण येथील मूळचे ढोमसे हे सध्या नाशिकमध्येच स्थायिक असून, शिल्पकला आणि चित्रकला या क्षेत्रातच ते दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. शिल्पकलेच्या आवडीमुळेच त्यांनी मविप्र संस्थेतील नोकरीही सोडली. कला शिक्षक अभ्यासक्रमाची पदविका प्राप्त केलेल्या ढोमसे यांनी शिल्पकलेतील कोणतेही अद्ययावत शिक्षण घेतलेले नसतानाही केवळ निरीक्षण आणि अभ्यास या गुणांच्या जोरावर तयार केलेल्या विविध प्रकारच्या शिल्पांना या क्षेत्रातील तज्ज्ञांचीही दाद मिळाली आहे. गोदावरी उद्यान परिचय स्वरूपातील त्यांचे एक शिल्प लवकरच सोमेश्वर धबधब्याजवळ बसविण्यात येणार आहे. पंचवटीतील निमाणी चौकातील ‘जय जवान-जय किसान-जय कामगार’ हे शिल्प त्यांच्या हातातील जादू समजण्यास पुरेसे ठरावे. ही जादू ‘म्युरल्स’मधूनही प्रकट झाली असून, पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहातील पंडितजींचे म्युरल्स त्याची साक्ष देईल. लक्ष्मणाने नाक कापलेली शूर्पणखा दर्शविणारे म्युरल्सही लवकरच काळाराम मंदिराबाहेर दिसणार आहे. याशिवाय नांदुर नाक्यावर शेतकऱ्याचे शिल्प उभारण्यात येणार आहे.        

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Olympic day run

ताज्या बातम्या