कॅमेऱ्याला सामोरं कसं जायचं इथपासून ते तुमच्या चेहऱ्यावर किती लाइट असला पाहिजे, चेहऱ्यावरचे हावभाव आणि कॅमेऱ्याच्या तंत्राची सांगड कशी घालायची, अशी कुठल्याच गोष्टींची माहिती नसतानाही चारुता रानडेला पहिली जाहिरात मिळाली. कोणत्या आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर अवघ्या काही सेकंदांतली पहिली जाहिरात केली ते कळलंच नाही. हे सांगणारी चारुता आज एखादी जाहिरात करायची की नाही हे ठरवून तसा निर्णय समोरच्यांना ठामपणे ऐकवता आला पाहिजे, असे अगदी अनुभवाचे बोल ऐकवण्याइतपत या जाहिरात क्षेत्रात रुळली आहे.
‘दिसायला सुंदर आहेस. तुझ्या छायाचित्रांचा एक पोर्टफोलिओ काढ’, असं सांगितल्यावर मी खरोखरच एका छायाचित्रकाराकडून सुंदरसा पोर्टफोलिओ करून घेतला. आता एवढे पैसे खर्चून पोर्टफोलिओ काढलाच आहे तर त्याचा उपयोगही करून पाहूया म्हणून मी तो एजन्सीमध्ये पाठवायला सुरुवात केली. काही दिवसांतच मला टीव्हीवरच्या जाहिरातीसाठी विचारणा झाली. माझी पहिली जाहिरात होती बाफना ज्वेलर्सची. एका नामांकित ज्वेलरी ब्रॅंडची जाहिरात मी करणार होते. पण, मला लाइट, कॅमेरा, अ‍ॅक्शन या कशाचीही माहिती नव्हती. कॅमेऱ्याला सामोरे कसे जायचे इथपासून ते आपली वेशभूषा, केशभूषा कशी करायला हवी, याची काहीही माहिती नसतानाही माझे पहिले चित्रीकरण झोकोत पार पडले. या जाहिरातीनंतर मग कामाचा ओघ सुरूच झाला.
या क्षेत्रात सुरुवातीला काहीच प्रशिक्षण घेतलेले नसतानाही मला काम मिळालं होतं, पण पहिल्या जाहिरातीनंतर मात्र मी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणानंतर माझा आत्मविश्वास अधिकच वाढला. माझ्या कुटुंबानेही मला खूप मोलाची साथ दिली. जाहिरातींसाठी ऑडिशनला जायचं म्हणजे तुम्हाला मनावर खूप संयम ठेवावा लागतो. एखादी जाहिरात आपल्याला मिळेलच असं वाटत असताना ती आपल्याला मिळत नाही. हे असं वारंवार होत राहिल्यावर आपल्या मनावर ताण येणं हे खूप स्वाभाविक असतं. परंतु मी याबाबतीत नशिबवान होते. मला कामं लवकर मिळत गेली. पण असे असंख्य चेहरेसुद्धा मी जवळून पाहिलेत की, ज्यांना काम नसल्यामुळे ताण येतो आणि कालांतराने ते या क्षेत्राकडे वळतही नाहीत. जाहिरात क्षेत्रात प्रत्येक गोष्ट ग्राहकाला कशी हवी या आधारावर केली जाते, त्यामुळे एखाद्या उत्पादनासाठी तुमची निवड झाली नाही म्हणून ती पुन्हा कधीच होणार नाही असे अजिबात नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
या क्षेत्रातील प्रत्येक अनुभव हा आपल्याला प्रगल्भ करत असतो. टीव्हीवर दिसणाऱ्या काही सेकंदांच्या जाहिरातीसाठी किती अपार मेहनत आहे हे इथे काम केल्याशिवाय कळणार नाही. सुरुवातीला मिळालेल्या जाहिरातींच्या पैशाने खरोखर आर्थिक बळकटी मिळाली. त्यानंतर मात्र काही दिवसांनी एका जाहिरातीसाठी माझं मानधन काय असेल हे सांगण्याचं स्वातंत्र्यही मी घेऊ लागले. त्याचं कारण म्हणजे या क्षेत्रात आपल्या कामाचं आपणच मूल्यमापन करायला शिकायला हवं. पहिल्यांदा आपल्या अनेक चुका होतात, पण त्यातूनच आपल्याला शिकता येतं. त्यामुळे एका मर्यादेनंतर एखादी जाहिरात तुम्हाला करायची नसेल तर तसा ठाम निर्णय समोरच्याला ऐकवणंही तुम्हाला जमलं पाहिजे. असं एखाद्या जाहिरातीला नाही म्हणणं आपल्याला फार कठीण जातं. पण तसं ते करायला हवं. आपण एखादी जाहिरात का करायची आणि का सोडायची, याबाबत आपले विचार स्पष्ट असलेच पाहिजेत. हे सगळं मी माझ्या अनुभवांवरून सांगते आहे.
 

चारुताचा सल्ला
 जाहिरात म्हणजे काही सेकंदांत ऐकवली जाणारी गोष्टच असते. त्यामुळे इथे तुमचा चेहरा किती सुंदर आहे यावर भर नसतोच. उलट, जाहिरातीत सामान्य चेहऱ्यांनाच जास्त मागणी असते. त्यामुळे फक्त स्वत:च्या कामावर विश्वास ठेवा म्हणजे खूप गोष्टी सोप्या होतील. प्रयत्न करत राहा. या क्षेत्रात प्रयत्नाशिवाय पर्याय नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे प्रत्येक ऑडिशन महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा.

चारुताने केलेल्या जाहिराती
 लाइफबॉय, डेटॉल, रेडिफ डील्स, बाफना ज्वेलर्स, एचडीएफसी, व्होडाफोन, ब्लॅकबेरी, हॉर्लिक्स क्रीम बिस्किट्स