उरण नगरपालिकेच्या क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. परंतु जून महिना उजाडला असतानाही शहरातील केवळ वीस टक्केच नाल्यांची सफाई झाली आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असताना नगरपालिकेची नालेसफाईची कामे पूर्ण होतील का, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. त्यातच नालेसफाईच्या कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये ९० टक्के नाले पावसाळ्यापूर्वी तर १० टक्के पावसाळा सुरू झाल्यानंतर करण्याची अट आहे.
अवघ्या अडीच ते तीन किलोमीटर अंतरात वसलेल्या उरण शहरात महत्त्वाचे तीन ते चार मोठे नाले आहेत. हे नाले पावसाळ्यापूर्वी साफ करण्याची गरज आहे. ते पावसाळ्यापूर्वी साफ होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात ये रे माझ्या मागल्याप्रमाणे पावसाचे पाणी सखळ भागातील इमारतीत शिरून अनेक घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. त्याचप्रमाणे नालेसफाई न झाल्याने शहरातील गटारे तुंबून गटारातील तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर साचण्याच्याही घटना दरवर्षी घडत आहेत. यामध्ये उरण शहरातील सर्वात मोठा दादर नाला आहे. यामध्ये कुंभारवाडा, मंगळमूर्ती, खोपकर अपार्टमेंट या परिसराचा समावेश आहे.
या परिसरात शहरालगत असलेल्या डोंगरआळी, नौदल तसेच द्रोणागिरी डोंगर परिसरातील नाले येऊन मिळत आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या भागात गुडघाभर पाणी साचून येथील चारचाकी वाहने पाण्याखाली जाऊन नुकसान होण्याच्या घटना घडत असल्याची माहिती महेश घरत या रहिवाशाने दिली आहे. तसेच आपला बाजार,स्वामी विवेकानंद चौक, नगरपालिका प्रवेशद्वार, खिडकोळी नाका आदी ठिकाणी दरवर्षी पावसाचे पाणी भरते.
या संदर्भात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता नगरपालिकेने मोठे नाले सफाई करण्यासाठी निविदा काढून कंत्राटदाराला काम दिले आहे. यापैकी २० टक्के काम पूर्ण झाले असून शहरातील छोटय़ा नाल्यांची सफाई पालिकेचे कर्मचारी करीत आहेत. पावसापूर्वी ही नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती त्यांनी या वेळी दिली आहे. यामध्ये ९० टक्के कामे पावसापूर्वी तर उरलेली १० टक्के कामे पाऊस झाल्यानंतर करावयाची असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.