नगर शहराजवळील, केडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या १३ खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामात ९ लाख १४ हजार रुपयांचा गैरव्यवहार व अपहार केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्याने ही रक्कम कार्यकारी अभियंता पोपट खंडागळे, तत्कालीन उपअभियंता एस. ए. पोवार (सध्या अकोले) व शाखा अभियंता आर. जी. पानसंबळ तसेच काम करणारी संस्था भीमा मजूर सहकारी संस्था यांच्याकडून ही रक्कम येत्या ४ दिवसांत वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिले. या रकमेची भरपाई न झाल्यास चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचेही आदेश आहेत. खंडागळे यांच्या गैरव्यवहाराचे इतर‘उद्योग’ही आता उघड झाले आहेत.
अपहाराची रक्कम वसूल झाल्यास फौजदारी होणार का, या प्रश्नावर अग्रवाल यांनी याचा निर्णय नंतर घेतला जाईल, असे उत्तर दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर (प्रशासन) या वेळी उपस्थित होते. कार्यकारी अभियंता खंडागळे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्रही राज्य सरकारला धाडण्यात आले आहे. त्यामध्ये केडगावमधील अपहारासह इतरही ठिकाणच्या गैरव्यवहाराचाही समावेश आहे. राज्य सरकारला पाठवलेल्या अहवालात खंडागळे यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
पोवार व पानसंबळ या दोघांना निलंबीत करण्याचा निर्णयही झाला असून त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तोपर्यंत पानसंबळ यांचे मोजमापे नोंदवण्याचे अधिकारही काढण्यात आले आहेत. निंबळक येथील रस्त्यांच्या कामातील गैरव्यवहारातही पानसंबळ सहभागी असल्याचे आढळल्याने त्यांनी नोंदवलेली सर्व मोजमापे पुन्हा तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जामखेड येथील पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा ठपकाही पंचायत राज समितीने खंडागळे यांच्यावर ठेवलेला आहे. वाळकी (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात सन २०१० मध्ये रस्ता तयार करण्यात आला, मात्र खंडगळे यांनी पुन्हा तोच रस्ता तयार करण्यासाठी १२ लाख ६० रु. खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. ही बाब पाटील यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तो प्रस्ताव रोखला. त्याचबरोबर खंडगळे यांनी पाथर्डी तालुक्यातील ४ रस्ते, नगर तालुक्यातील २ रस्ते व श्रीगोंदे तालुक्यातील ३ रस्ते असे एकुण १८ लाख रुपये खर्चाचे ९ रस्ते अर्थ विभागाची शिफारस न घेताच, त्याचे काम सुरु केल्याचा ठपका आहे. या सर्व प्रकरणांचा दोषारोपपत्रात समावेश करण्यात आल्याची माहिती अग्रवाल व भोर यांनी दिली.