संत शिरोमणी मारुतीमहाराज सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे कारखान्यावर प्रशासक नेमून निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मारुतीमहाराज कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून १६ महिने झाले आहेत. त्यामुळे सहकारी संस्था निबंधकांनी दहा दिवसांत कारखान्यावर प्रशासक नियुक्त करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून तीन महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कारखान्याचे १ हजार ६०३ सभासद वादग्रस्त असल्यामुळे यादीतून वगळण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांना दिलासा देणारा निर्णय देताना सभासदांचे मतदान घेऊन त्याची मतमोजणी न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत करू नये, असेही म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे मारुतीमहाराज कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लवकर घेतली जाण्याचे संकेत आहेत.