जानेवारी ते एप्रिल २०१३ या चार महिन्यांचा थकीत महागाई भत्ता माध्यमिक शिक्षकांना रोखीने, ऑगस्टच्या वेतनात मिळणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील गाडगे यांनी दिली.
सरकारी कर्मचा-यांना चार महिन्यांचा महागाई भत्ता रोखीने देण्याचा आदेश राज्य सरकारने २९ जूनला काढला या पार्श्र्वभूमीवर जिल्हा शिक्षक भारती व महिला शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिका-यांनी प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी नरेंद्र खंदारे व वेतन पथकाचे अधीक्षक संजय गंभिरे यांची भेट घेतली व थकीत मंजूर भत्ता त्वरित देण्याची मागणी केली. ती मान्य करताना येत्या ऑगस्टमध्ये हा फरक अदा करण्याचे आदेश खंदारे यांनी दिले.
जिल्ह्य़ातील ७३१ माध्यमिक शाळांतील १० हजार ६८१ शिक्षक व ४ हजार ८१६ शिक्षकेतर कर्मचा-यांना त्याचा लाभ मिळणार आहे. २८ फेब्रुवारी १०१२ अखेर जी बिले वेतन पथकाला सादर करण्यात आली, त्यासाठी ४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे, निधी उपलब्ध होताच ती अदा करण्यात येतील, असे गंभिरे यांनी सांगितले. सरकारने जानेवारी २०१३ पासून महागाई भत्त्यात ८ टक्के वाढ केली आहे. १ मे पासूनची दरवाढ यापूर्वीच रोखीने दिली आहे. शाळांनी फरक तक्ते बिलासोबतच जोडावेत व वेतन १ तारखेलाच होण्यासाठी शाळांनी पगार बिले दि. १ ते दि. ७ पर्यंतच द्यावीत, असेही अवाहन गंभीरे यांनी केले.
पदाधिकारी बाबासाहेब लोंढे, मोहमदसमी शेख, आशा मगर, शोभना गायकवाड, विभावरी रोकडे, वैशाली आहेर आदींनी चर्चेत भाग घेतला.